
नंदुरबार, 28 एप्रिल (हिं.स.) । हॉटेल, रेस्टॉरंट, केटरर्स आणि फास्ट-फूड केंद्रांमध्ये पनीर किंवा चीजच्या ऐवजी ‘चीज अॅनालॉग’चा वापर करून ग्राहकांची दिशाभूल केली जात असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर ग्राहकांची फसवणूक थांबवण्यासाठी आणि व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी प्रशासनाने कडक नियमावली जाहीर केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्त सपना पाटील यांनी दिली.
पनीर आणि ऍनालॉगमधील फरक स्पष्ट
अन्न सुरक्षा मानके नियमन 2011 नुसार ‘पनीर’ हा केवळ दुधापासून बनविलेला पदार्थ असून तो प्रथिनांचा समृद्ध स्रोत मानला जातो. याउलट ‘डेअरी ऍनालॉग’ हा दूधविरहित खाद्यतेल, स्टार्च आणि इमल्सिफायर वापरून तयार केला जातो. दिसायला पनीरसारखा असला तरी तो प्रत्यक्षात पनीर नसतो. ऍनालॉग आरोग्यास अपायकारक नसला तरी त्याची पोषणमूल्ये पनीरपेक्षा वेगळी असतात.
अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 अंतर्गत ग्राहकांना आपण काय खात आहोत हे जाणून घेण्याचा अधिकार आहे.
त्यानुसार:
ऍनालॉगचा वापर केल्यास मेन्यूकार्ड, इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड आणि बिलावर स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक आहे.
विक्रेत्यांनी बिलावर ‘डेअरी ऍनालॉग’ किंवा ‘चीज ऍनालॉग’ असा उल्लेख करणे आवश्यक.
उत्पादकांनी पॅकेजिंग व लेबलिंगमध्ये दिशाभूल होणार नाही याची काळजी घ्यावी.
परवान्यांबाबत प्रशासनाचा इशारा
अनेक व्यावसायिकांनी परवाना घेताना स्वतःचा ईमेल आयडी किंवा मोबाईल क्रमांक न देता इतर व्यक्तींची माहिती दिल्याचे आढळले आहे. अशा व्यावसायिकांनी तात्काळ स्वतःची माहिती अद्ययावत करावी, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न सुरक्षा आयुक्त श्रीधर डुबे-पाटील यांनी दिला आहे.
पॅकेटवरील लेबल तपासून ‘ऍनालॉग’ असा उल्लेख आहे का ते पहा.
सुटे पनीर खरेदी करताना ते शुद्ध दुधाचे आहे याची खात्री करा आणि आवश्यक असल्यास बिल घ्या.
हॉटेलमध्ये ऑर्डर देताना पनीर आणि ऍनालॉग वेगवेगळे असल्याची खात्री करून घ्या. ग्राहकांची दिशाभूल झाल्यास 1800-222-365 या टोल-फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर