
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग
अमरावती, 28 एप्रिल (हिं.स.) :
राज्यात विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी उमेदवारांची नावे निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना अमरावतीतील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. ‘प्रहार’ जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्या संभाव्य उमेदवारीवरून चर्चांना उधाण आले आहे.
शिंदे गटाच्या शिवसेनेकडून बच्चू कडू यांचे नाव जवळपास निश्चित असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. अशातच कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी मानले जाणारे आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात फोनवर संवाद झाल्याची माहिती समोर आल्याने विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांमध्ये अलीकडेच फोनवरून चर्चा झाली असून या संवादामागील नेमका उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या चर्चेमुळे शिंदे गटातील अंतर्गत राजकीय हालचालींना वेग आला आहे.
दुसरीकडे, आमदार रवी राणा यांनी एका सभेत बोलताना मंत्रिपदाची आपली इच्छा स्पष्टपणे व्यक्त केली. “मी चार वेळा आमदार झालो असून दहा आमदारांचे काम एकटाच करतो. मुख्यमंत्री संधी देतील तर मी दहा मंत्र्यांचे कामही करू शकतो,” असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
बच्चू कडू आणि रवी राणा या दोघांचीही मंत्रिपदावर नजर असल्याने अमरावतीच्या राजकारणातील स्पर्धा आता राज्यस्तरावर, विशेषतः मुंबईतील राजकीय वर्तुळात पोहोचल्याचे चित्र दिसत आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी