
लातूर, 28 एप्रिल (हिं.स.)। वडिलांच्या धाकामुळे घर सोडून गेलेल्या दोन अल्पवयीन भावंडांचा केवळ १५ तासांच्या आत यशस्वी शोध घेऊन अहमदपूर पोलिसांनी कर्तव्याचा आदर्श घालून दिला आहे. हिंगोली जिल्ह्यातील अजनसोंडा येथील रहिवासी असलेले साहेबराव मुळे हे कुटुंब अहमदपूर परिसरात मध गोळा करण्याच्या कामासाठी आले असताना, २७ एप्रिल रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास ११ वर्षांचा संदिप आणि ९ वर्षांची वंदना ही दोन भावंडे इंदिरा नगर, काळेगाव रोड भागातून बेपत्ता झाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपासाची सर्व सूत्रे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष केदाशे यांच्याकडे सोपवण्यात आली.
मुलांचा शोध घेण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांनी पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली तातडीने चार विशेष पथके तयार करण्यात आली. या मोहिमेत पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार, सपोनि संतोष केदाशे, पीएसआय आनंद श्रीमंगल, पीएसआय रवी बुरकुले यांच्यासह पोलीस हवालदार बाळू आरदवाड, तानाजी आरदवाड, पोलीस अंमलदार विशाल सारोळे आणि पद्माकर पांचाळ या पथका सह उपविभागीय पोलीस अधिकारी रायबोले व पोलीस निरीक्षक मेत्रेवार यांनी रात्रभर डोळ्यांत तेल घालून अहमदपूर शहराचा कोपरा न् कोपरा पिंजून काढला.
सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, निर्जन स्थळे, बस स्थानके आणि शहरातील गल्लोगल्ली शोध घेण्यासोबतच सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून मुलांचे फोटो सर्वत्र प्रसारित करण्यात आले. पोलिसांची ही शोधमोहीम रात्रभर सुरू असतानाच, २८ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता हाडोळती येथील एका हॉटेल चालकाने पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांना फोन करून माहिती दिली की, व्हायरल मेसेजमधील वर्णनाची दोन मुले त्यांच्यासमोर हॉटेलमध्ये खिचडी खात आहेत.
माहिती मिळताच तपास अधिकारी सपोनि संतोष केदाशे व त्यांच्या टीमने तात्काळ दूरक्षेत्र अंमलदार ज्ञानोबा येमले, पोलीस अंमलदार मारुती शिंदे आणि आत्माराम आंबिलवाड यांच्या सहकार्याने हाडोळती गाव, आनंदवाडी आणि बाबळदरा शिवार पिंजून काढले. अखेर सकाळी ९:३० वाजता हाडोळती येथील सरकारी दवाखान्याजवळील एका शेतात ही दोन्ही मुले सुखरूप मिळून आली. मुलांकडे अधिक चौकशी केली असता, सायकल खेळताना पाहून वडील मारतील या भीतीपोटी आपण घर सोडल्याचे त्यांनी सांगितले.
अहमदपूर ते शिरूर ताजबंद आणि त्यानंतर हाडोळती असा प्रवास त्यांनी पायी आणि भिक्षा मागून मिळालेल्या पैशातून केला होता. कोणाचेही अपहरण झाले नसून केवळ भीतीपोटी मुले भरकटली असल्याचे स्पष्ट झाल्याने पालकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. केवळ १५ तासांच्या आत या मोहिमेला यश मिळवून देणाऱ्या अहमदपूर पोलीस दलातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या या कामगिरीचे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार तपास अधिकारी संतोष केदाशे यांच्या नियोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis