नॅकच्या बदलत्या निकषांसाठी प्राध्यापकांनी सज्ज व्हावे – प्रा. धर्माधिकारी
नांदेड, 28 एप्रिल (हिं.स.) : महाविद्यालयीन गुणवत्ता तपासणीसाठी कार्यरत असलेली राष्ट्रीय स्तरावरील नॅक संस्था काळानुरूप आपले स्वरूप बदलत आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात विज्ञान-तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करणे आवश्यक असून प्राध्यापकांनी नवीन शैक्षणिक
नॅकच्या बदलत्या निकषांसाठी प्राध्यापकांनी सज्ज व्हावे – प्रा. धर्माधिकारी


नांदेड, 28 एप्रिल (हिं.स.) : महाविद्यालयीन गुणवत्ता तपासणीसाठी कार्यरत असलेली राष्ट्रीय स्तरावरील नॅक संस्था काळानुरूप आपले स्वरूप बदलत आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात विज्ञान-तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करणे आवश्यक असून प्राध्यापकांनी नवीन शैक्षणिक बदलांना सामोरे जावे, असे प्रतिपादन नॅक तज्ज्ञ प्रा. डॉ. नागनाथ धर्माधिकारी यांनी केले.

ग्रामीण (कला, वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालय, वसंतनगर (ता. मुखेड, जि. नांदेड) येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने आयोजित ‘नॅकला सामोरे जाताना’ या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. त्यांनी पुढे सांगितले की, शिक्षणात प्राचीन भारतीय परंपरा, कौशल्याधारित अभ्यासक्रम तसेच नैतिक मूल्यांचा समावेश करणे गरजेचे आहे. तसेच ब्लेंडेड लर्निंग, वेबिनार आणि आधुनिक अध्यापन पद्धतींना महत्त्व देऊन विद्यार्थ्यांपर्यंत अद्ययावत ज्ञान पोहोचवावे, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिदास राठोड यांनी नॅकचे कार्य संपूर्ण संस्थेसाठी महत्त्वाचे असल्याचे सांगितले. “आपण सर्वांनी प्रामाणिकपणे काम केल्यामुळे महाविद्यालयाला यापूर्वी ‘अ’ दर्जा मिळाला असून तो टिकवून पुढील दर्जा मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यशाळेचे प्रास्ताविक अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख प्रा. डॉ. डी. सी. पवार यांनी केले. त्यांनी वर्षभरात राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती देत पुढील वर्षाचा आराखडा तयार असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. कविता लोहाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. रामकृष्ण बदने यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande