
पुणे, 28 एप्रिल, (हिं.स.)। गेल्या तीन वर्षांपासून शहराचे वाढते तापमान, वाढलेल्या नागरिकांमुळे पाण्याची वाढलेली मागणी आणि महापालिकेस शहराला पाणीपुरवठा करताना येणाऱ्या अपयशामुळे पुणेकरांना आपली तहान भागविण्यासाठी वाढती टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. गेल्या दोन वर्षांपासून शहरात पाण्याच्या टँकरची मागणी वर्षाला ५० हजार फेऱ्यांनी वाढली आहे. एप्रिल २०२३ ते मार्च २४ मध्ये सुमारे ४ लाख ३४८ फेऱ्या झाल्या होत्या. ही संख्या एप्रिल २०२४ ते मार्च २५ पर्यंत ४ लाख ८९ हजारांवर गेली होती. एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ अखेर ही संख्या तब्बल ५ लाख १७ हजारांवर गेली. यातून गेल्या दोन वर्षांत सरासरी ५० ते ५५ हजार टँकरच्या फेऱ्या वाढल्याचे दिसते.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडील नोंदीनुसार, मार्च २०२४ मध्ये शहरभर टँकरच्या सुमारे ३८ हजार २९९ फेऱ्या झाल्या होत्या. मार्च २०२५ मध्ये या फेऱ्यांची संख्या सुमारे ४७ हजार ८९६ वर पोहोचली. यंदाच्या मार्च २०२६ मध्ये ही संख्या थेट ५८ हजारांच्या पुढे गेली. त्यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाण्याची मागणी झपाट्याने वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.यंदा १ ते २६ एप्रिल या २६ दिवसांतच टँकरच्या ५५ हजारांहून अधिक फेऱ्या झाल्या आहेत. महिन्याच्या उर्वरित दिवसांतील मागणी लक्षात घेता एप्रिलअखेर हा आकडा ६२ ते ६३ हजार फेऱ्यांपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु