
परभणी, 28 एप्रिल (हिं.स.)। मानवत तालुक्याच्या नूतन गटशिक्षणाधिकारीपदी सुनीलकुमार तोष्णीवाल यांनी पदभार स्वीकारला. यानिमित्त गट साधन केंद्राच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. माजी गटशिक्षणाधिकारी मंगेश नरवाडे यांनी शाल व श्रीफळ देऊन तोष्णीवाल यांचे अभिनंदन करत स्वागत केले.
यावेळी ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पवार सर, राजकुमार गाढे, गिरी सर, पाटील सर, वाबूरकर सर, सीमाताई कच्छवे तसेच गट साधन केंद्रातील तज्ज्ञ समन्वयक उपस्थित होते. कार्यक्रमात राजकुमार गाढे यांनी मनोगत व्यक्त करत सुनीलकुमार तोष्णीवाल यांना पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. आपल्या अनुभव, ज्ञान आणि कार्यशैलीतून तालुक्याच्या शिक्षण क्षेत्राला योग्य दिशा व मार्गदर्शन मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. यापूर्वी तालुक्यात सेवा केलेली असल्याने तालुक्यातील परिस्थिती आणि गरजा त्यांना परिचित असल्याचेही नमूद करण्यात आले. यावेळी बोलताना नव्या नेतृत्वाखाली प्रशासन अधिक स्वच्छ, पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तसेच माजी गटशिक्षणाधिकारी मंगेश नरवाडे यांनीही आपल्या कार्यकाळात पारदर्शक व गुणवत्तापूर्ण प्रशासन देत सर्व घटकांना मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमात दोन्ही अधिकाऱ्यांच्या कार्याचा गौरव करत उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis