शिक्षकांवर प्रशिक्षण, जनगणना आणि निवडणूक कामांचा तिहेर भार
अमरावती, 28 एप्रिल (हिं.स.) : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्राथमिक शिक्षक सध्या शैक्षणिक तसेच अशैक्षणिक कामांच्या तिहेरी ओझ्यामुळे मोठ्या तणावात आहेत. एकाच वेळी प्रशिक्षण, जनगणना आणि मतदारयादी पडताळणीची कामे आल्याने शिक्षकांमध्ये च
तिहेरी कामाच्या ओझ्याखाली शिक्षक;  ४६° उष्णतेत शाळा सुरू ठेवण्याच्या आदेशांवर संताप


अमरावती, 28 एप्रिल (हिं.स.) : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्राथमिक शिक्षक सध्या शैक्षणिक तसेच अशैक्षणिक कामांच्या तिहेरी ओझ्यामुळे मोठ्या तणावात आहेत. एकाच वेळी प्रशिक्षण, जनगणना आणि मतदारयादी पडताळणीची कामे आल्याने शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीच्या नव्या अभ्यासक्रमासाठी 11 ते 14 मे दरम्यान जिल्हास्तरीय प्रशिक्षण तर 18 ते 30 मे या कालावधीत तालुकास्तरीय प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आले आहे. त्याच काळात 2027 च्या जनगणनेचा पहिला टप्पा सुरू होणार असून शिक्षकांना प्रगणक आणि पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

याशिवाय बीएलओ म्हणून मतदारयादी पडताळणीसाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचे कामही शिक्षकांवर सोपवण्यात आले आहे.

या सर्व जबाबदाऱ्यांमुळे उन्हाळी सुट्ट्यांवर परिणाम झाला असून, कामावर गैरहजर राहिल्यास कारवाईची भीती शिक्षकांना भेडसावत आहे.

या पार्श्वभूमीवर शिक्षक संघटनांनी प्रशिक्षणाचे वेळापत्रक बदलण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. दरम्यान, 28 ते 30 एप्रिल दरम्यान अंदाज समितीच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर 46 अंश तापमानात शाळा सकाळी 7 ते सायंकाळी 5 पर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पहिल्या वर्गाचा प्रवेशोत्सव घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

या निर्णयांमुळे शिक्षक आणि मुख्याध्यापक अडचणीत आले असून, कडाक्याच्या उन्हात लहान विद्यार्थ्यांना शाळेत बोलावणे धोकादायक असल्याची भावना व्यक्त होत आहे. “एसी कार्यालयातून घेतलेले निर्णय वास्तवापासून दूर आहेत,” अशी टीका शिक्षकांकडून होत असून, या निर्णयांचा पुनर्विचार करण्याची मागणी जोर धरत आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande