इगतपुरीत 3 लाचखोर अभियंत्यांना रंगेहाथ अटक
इगतपुरी, 28 एप्रिल (हिं.स.) : इगतपुरी येथील जिल्हा परिषद उपविभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई करत 6,000 रुपयांची लाच घेताना तीन अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई रस्ते कामाच्या बिल मंजुरीच्या प्रक्रियेदरम्यान करण्यात आ
अटक लोगो


इगतपुरी, 28 एप्रिल (हिं.स.) :

इगतपुरी येथील जिल्हा परिषद उपविभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई करत 6,000 रुपयांची लाच घेताना तीन अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई रस्ते कामाच्या बिल मंजुरीच्या प्रक्रियेदरम्यान करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये सहाय्यक अभियंता सतिष साहेबराव दराडे (42), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सागर सतिष रावले (35) आणि कनिष्ठ सहाय्यक अभियंता रविंद्र रामनाथ गायकवाड (29) यांचा समावेश आहे.

तक्रारदार हे सुशिक्षित बेरोजगार अभियंता असून त्यांनी 14 व्या वित्त आयोगांतर्गत पिंपळगाव मोर (ता. इगतपुरी) येथे सिमेंट काँक्रीट रस्त्याची दोन कामे पूर्ण केली होती. सुमारे 4.5 लाख रुपयांच्या बिल मंजुरीसाठी सहाय्यक अभियंता दराडे यांनी 2 टक्के प्रमाणे 9,000 रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर ही रक्कम 6,000 रुपयांवर निश्चित झाली होती.

या प्रकरणाची तक्रार एसीबीकडे करण्यात आल्यानंतर 23 मार्च रोजी पडताळणी करण्यात आली. त्यानंतर 27 एप्रिल 2026 रोजी इगतपुरी जिल्हा परिषद कार्यालयात सापळा रचण्यात आला.

कारवाईदरम्यान आरोपी दराडे यांनी लाचेची रक्कम ड्रॉवरमध्ये ठेवण्यास सांगितले आणि ती रक्कम नंतर कनिष्ठ अभियंता गायकवाड यांच्याकडे सोपवण्यात आली. त्याच वेळी एसीबी पथकाने तिघांनाही रंगेहाथ पकडले.

ही कारवाई एसीबीच्या पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी यांच्या नेतृत्वाखाली आणि पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या घटनेमुळे जिल्हा परिषद प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande