वरूड–मोर्शी महामार्गावर भीषण अपघात : एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
अमरावती, 28 एप्रिल (हिं.स.) : लग्नसमारंभाच्या आनंदावर काळाने विरजण घातल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी सकाळी वरूड–मोर्शी महामार्गावर घडली. भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झा
Three members of a family die after car hits tree on Warud-Morshi highway


अमरावती, 28 एप्रिल (हिं.स.) :

लग्नसमारंभाच्या आनंदावर काळाने विरजण घातल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी सकाळी वरूड–मोर्शी महामार्गावर घडली. भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील कामठी खैरी भागातील विनायक कॉलनी येथील नांदे कुटुंब एका लग्नकार्यासाठी प्रवास करत होते. त्यांची कार (एमएच 40 केआर 0721) खडकी फाट्याजवळ आली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्यालगत असलेल्या मोठ्या झाडावर जाऊन आदळली. धडक इतकी जोरदार होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला.

या अपघातात समाधान किसनराव नांदे (62), किरण गोपाल नांदे (28) आणि तीन वर्षांची चिमुकली दिया गोपाल नांदे यांचा मृत्यू झाला. समाधान नांदे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी किरण नांदे आणि लहान दिया यांना रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.

कार चालक गोपाल समाधान नांदे (34) हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघाताचा जोरदार आवाज ऐकताच खडकी येथील सरपंच राहुल फुले आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. बेनोडा येथून रुग्णवाहिका मागवून जखमींना तातडीने बाहेर काढण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच बेनोडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. अपघाताचे नेमके कारण—वाहनातील तांत्रिक बिघाड की चालकाला आलेली झोप—याचा तपास सुरू आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande