रत्नागिरी : कीटकजन्य आजारांबाबत व्यापक जनजागृती सुरू
रत्नागिरी, 28 एप्रिल, (हिं. स.) : “हिवताप दुरीकरणासाठी कटिबद्ध- आता हे शक्य आहे आणि आता हे केलेच पाहिजे,” हा निर्धार व्यक्त करत रत्नागिरी जिल्ह्यात ‘जागतिक हिवताप दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने कीटकजन्य आजारांबाबत जनतेमध्ये व्यापक जन
रत्नागिरी : कीटकजन्य आजारांबाबत व्यापक जनजागृती सुरू


रत्नागिरी, 28 एप्रिल, (हिं. स.) : “हिवताप दुरीकरणासाठी कटिबद्ध- आता हे शक्य आहे आणि आता हे केलेच पाहिजे,” हा निर्धार व्यक्त करत रत्नागिरी जिल्ह्यात ‘जागतिक हिवताप दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने कीटकजन्य आजारांबाबत जनतेमध्ये व्यापक जनजागृती करण्यात येत असून, ग्रामीण भागात आरोग्य शिक्षणावर भर दिला जात असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव यांनी दिली.

जगातील निम्मी लोकसंख्या कीटकजन्य आजारांच्या सावटाखाली आहे. डासांसह सांडसाव, पिसवा, ढेकूण आणि गोचीड यांसारख्या कीटकांमुळे गंभीर आजार पसरत आहेत. जगातील ८७ देशांमध्ये हिवतापाची समस्या असून, दरवर्षी सुमारे ६ लाख लोकांचा यामुळे मृत्यू होतो. विशेषतः शहरीकरण आणि वातावरणातील बदलामुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव मागील ५० वर्षांत ३० पटीने वाढला आहे. जपानी मेंदूज्वर आणि चांदीपूर मेंदूज्वर यांसारखे जीवघेणे आजारही चिंतेचा विषय ठरत आहेत. डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या त्वरित निदानासाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या मार्गदर्शनाखाली २३ सेंटिनल प्रयोगशाळा कार्यरत आहेत.

रुग्णांना आवश्यक औषधसाठा आणि उपचार मोफत उपलब्ध करून दिले जात आहेत. कीटकजन्य आजार नियंत्रणात लोकसहभाग हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. परिसर स्वच्छ ठेवणे, कोठेही पाणी साचू न देणे आणि आठवड्यातून किमान एक दिवस 'कोरडा दिवस' पाळणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असे आवाहन डॉ. संतोष यादव यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande