
सोलापूर, 28 एप्रिल (हिं.स.)। सोलापूर शहरातील वाढत्या तापमानाचा फटका केवळ नागरिकांनाच नव्हे तर वीज यंत्रणेलाही बसत असल्याचे चित्र समोर आले. नवी चौकी परिसरातील महावितरणच्या फिडर लाईनची केबल अचानक शॉर्ट होऊन जळाल्याने सकाळपासूनच अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे दस्तुरखुद्द उमानगरातील महावितरणच्या कार्यालयातील वीज गुल झाली होती.
वीज नसल्याने कार्यालयीन कामकाज ठप्प झाले तर दुसरीकडे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. सकाळी साडेनऊच्या सुमारास सुरू झालेल्या या बिघाडामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी जवळपास दोन ते अडीच तास युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम केले.
अखेर नवी पोलिस चौकीजवळील फिडर लाईनमध्ये दोष आढळून आल्यावर केबल बदलण्यात आली आणि दुपारी बाराच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार वाढत्या उन्हामुळे केबल बस्ट होऊन हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे; मात्र या सर्व प्रकारात नागरिकांना अधिक त्रास झाला तो कर्मचाऱ्यांच्या उर्मट वागणुकीमुळे. वीज कधी येणार याची विचारणा करणाऱ्या नागरिकांना आमच्याच कार्यालयात वीज नाही, तुमचे काय घेऊन बसलात? अशी असमाधानकारक उत्तरे देण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड