
रत्नागिरी, 28 एप्रिल, (हिं. स.) : चिपळूण येथील १४ वर्षांच्या शाळकरी मुलीला पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी संदेश सोमा बारे (रा. गोंधळे, ता. चिपळूण) याला चिपळूण येथील विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांनी २० वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजाराचा दंड अशी शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम पीडित मुलीस नुकसान भरपाई म्हणून देण्याचा न्यायालयाने आदेश दिला.
शाळकरी मुलीला दि. ४ ऑगस्ट २०१९ रोजी पळवून नेऊन आरोपी संदेश सोमा बारे याने वेगवेगळ्या ठिकाणी तसेच जंगलात नेऊन वेळोवेळी बलात्कार केला. पीडित मुलीच्या आईने चिपळूण पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याबाबत तक्रार दिली होती. पोलिसांना मुलीच्या शोध मोहिमेनंतर सुमारे ७ दिवसांनी पीडित मुलगी एका निर्जन ठिकाणी पडीक घरात आढळली. पीडित मुलीला आणि आरोपी यांना पोलीसांनी पोलीस ठाण्यात आणले आणि पीडित मुलीचा जबाब नोंदविण्यात आला. जबाबात आरोपीने पीडित मुलगी १४ वर्षांची आहे हे माहीत असतानादेखील तिला पळवून नेल्यावर वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केल्याचे निष्पन झाले. मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्याच्या कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यावर चिपळूण पोलिसांनी न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोप दाखल केले.
या सत्र खटल्याची सुनावणी चिपळूण येथील विशेष न्यायालयाच्या जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांच्यासमोर सुरू होती. पीडित मुलगी, तिची आई, वैद्यकीय अधिकारी, गुन्ह्याचे तपास अधिकारी यांच्यासह एकूण १० साक्षीदारांची महत्त्वपूर्ण साक्ष विशेष सरकारी अभियोक्ता पुष्पराज शेट्ये यांनी घेतली. त्यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपी संदेश सोमा बारे याला पोक्सो कायद्यान्वये दोषी ठरवून २० वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा आणि दंड न भरल्यास ६ महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. आरोपीने दंड भरल्यास ही दंडाची सर्व रक्कम पीडित मुलीस नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेश देण्यात आला.
आठवडाभरापूर्वीच अन्य एका अशाच स्वरूपाच्या खटल्यात डॉ. अनिता एस. नेवसे यांनी १३ वर्षांच्या शाळकरी मुलीवर मातृत्व लादणाऱ्या आरोपीस शिक्षा ठोठावली होती. अशा न्यायनिर्णयामुळे लहान मुलींवरील होणाऱ्या लैंगिक अत्याचारात मोठी घट होईल, असे मत व्यक्त केले जात आहे.
पोक्सो कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत असल्याची प्रतिक्रिया सरकारी वकिलांनी व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी