
अमरावती, 29 एप्रिल (हिं.स.)स्थानिक डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात आणखी एक किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली. अंजनगावसुर्जी तालुक्यातील भंडारज येथील मध्यमवर्गीय कुटुंबातील एका पित्याने त्यांची किडनी देऊन मुलाचा जीव वाचविला. ३४ वर्षीय व्यावसायिक असलेली ही व्यक्ती गेल्या दिवाळीपासून त्रस्त होती. त्याला दम भरून येणे, बीपी वाढणे अशासारखा त्रास होत असताना स्थानिक पातळीवर तपासणी केली असता असे आढळले की त्याच्या दोन्ही किडन्या काम करीत नाहीत, अशा परिस्थितीत त्याला डायलिसीस सांगितले गेले. परंतु त्याने डायलिसिस घेतले नाही, या वळणावर डॉ. पंजाबराव देशमुख महाविद्यालयात प्रत्यारोपण समन्वयक सतीश वडनेरकर यांनी त्याला आजाराबाबत व प्रत्यारोपणाबाबत समूपदेशन केले. कुटुंबातील आई, बाबांनी किडनी दिल्यास आपण पूर्ववत आयुष्य जगू शकतो, असा विश्वास त्याच्यात निर्माण केला. शहरातील नामांकित नेप्पोलॉजिस्ट डॉ. हितेश गुल्हाने यांच्याकडे उपचार घेणे सुरू केले. डॉ. गुल्हाने यांनी यावर किडनी प्रत्यारोपण हा उत्तम पर्याय असल्याचे सुचविले. तपासणीअंती त्याला किडनी देण्याकरिता त्याच्या वडिलांनी पुढाकार घेतला. त्यांनी मुलाला प्रेमापोटी व त्याचे आयुष्य चांगले व्हावे, हा दृष्टिकोन ठेवून किडनी देऊन जीवनदान दिले. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनिल देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. पवन टेकाडे, डॉ. सोमेश्वर निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली यूरोलॉजीस्ट डॉ. राहुल पोटोडे, डॉ. विक्रम देशमुख, डॉ. विशाल बाहेकर, डॉ. राहुल घुले, डॉ. प्रतीक चिरडे आदींनी परिश्रम घेतल्याने त्या व्यक्तीचा जीव वाचला असून तो चांगले आयुष्य जगू शकणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी