अमरावती जिल्ह्यात 10 लाखांहून अधिक वीजचोरी उघड
अमरावती, 29 एप्रिल (हिं.स.) : महावितरणच्या भरारी पथकाने अंजनगाव आणि परतवाडा परिसरात केलेल्या तपासणीत एकूण 10 लाख 4 हजार 122 रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली आहे. या कारवाईनंतर संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अं
अमरावती जिल्ह्यात 10 लाखांहून अधिक वीजचोरी उघड


अमरावती, 29 एप्रिल (हिं.स.) : महावितरणच्या भरारी पथकाने अंजनगाव आणि परतवाडा परिसरात केलेल्या तपासणीत एकूण 10 लाख 4 हजार 122 रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली आहे. या कारवाईनंतर संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अंजनगावच्या अकोट रोड परिसरात संशयित अयुब खान युसूफ खान आणि मोहसीन खान युसूफ खान या दोन वीज ग्राहकांनी मीटरमध्ये फेरफार करून अवैधरीत्या वीज वापरल्याचे आढळले. त्यांनी इनकमिंग सर्व्हिस वायरला पांढऱ्या रंगाची वायर जोडून सुमारे 28,974 युनिट वीज चोरी केल्याचे तपासात समोर आले. या प्रकारामुळे महावितरणला सुमारे 8 लाख 1 हजार 780 रुपयांचे नुकसान झाले आहे.

या प्रकरणी श्रीकांत पंजाब तळेगावकर यांच्या तक्रारीवरून अचलपूर पोलिसांनी दोन्ही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दुसरी घटना परतवाड्यातील बैतूल नाका परिसरातील अलबशीर कन्फेक्शनरी येथे उघडकीस आली. येथे संशयित मोहम्मद शादाब शेख बशीर यांनी याच पद्धतीने मीटरमध्ये फेरफार करून सुमारे 9,190 युनिट वीजचोरी केल्याचे आढळले. यामुळे महावितरणला 2 लाख 12 हजार 342 रुपयांचे नुकसान झाले आहे.

या प्रकरणातही तळेगावकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या वीजचोरीमुळे कंपनीला मोठे आर्थिक नुकसान होत असून त्याचा अप्रत्यक्ष फटका नियमितपणे वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना बसतो. त्यामुळे पुढील काळात तपासणी मोहिमा अधिक कडक केल्या जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

--------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande