
अमरावती, 29 एप्रिल (हिं.स.) : लोकशिक्षणाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या संत गाडगे बाबा यांच्या जन्मगावी शैक्षणिक व्यवस्थेची चिंताजनक अवस्था समोर आली आहे. शेंडगाव येथील त्यांच्या नावाने सुरू असलेली माध्यमिक शाळा बंद पडल्याने स्थानिक विद्यार्थ्यांना इतर गावांकडे जावे लागत आहे.
संत गाडगेबाबा जन्मभूमी स्मारक समितीमार्फत 1975 साली स्थापन झालेल्या या संस्थेला 1982 मध्ये शाळा सुरू करण्यास मान्यता मिळाली होती. अनेक वर्षे या विद्यालयातून हजारो विद्यार्थी घडले आणि त्यांनी विविध क्षेत्रांत नावलौकिक मिळवला. सुमारे 1100 लोकसंख्या असलेल्या शेंडगावसह आसपासच्या 10 गावांतील विद्यार्थी येथे पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेत होते.
मात्र बदलत्या काळात इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा वाढता प्रभाव आणि आवश्यक शैक्षणिक सुधारणा न झाल्याने या शाळेतील विद्यार्थीसंख्या घटत गेली. परिणामी पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग बंद करण्यात आले असून केवळ बारावीपर्यंत मर्यादित शिक्षण सुरू आहे. सध्या शाळेत फक्त तीन शिक्षक उरले असून त्यामुळे पालकांचा कल इतर शाळांकडे वाढला आहे.
दरम्यान, कोट्यवधी रुपयांच्या इमारती गावात निष्क्रिय अवस्थेत पडून असताना शाळा बंद पडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शाळा बंद होण्याच्या प्रक्रियेदरम्यान कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्याने, राजकीय नेत्याने किंवा प्रशासनाने पुढाकार घेतला नाही, अशी खंत स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
“ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली ही शाळा बंद पडणे अत्यंत दुर्दैवी आहे,” असे मत शेंडगावचे रहिवासी प्रवीण जानोरकर यांनी व्यक्त केले.
या घटनेमुळे ग्रामीण शिक्षणाच्या स्थितीवर आणि धोरणांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी