कृषी सेवा केंद्रांचा बेमुदत बंद तिसऱ्या दिवशीही कायम; शेतकरी अडचणीत
अमरावती, 29 एप्रिल (हिं.स.) : तालुक्यातील कृषी साहित्य विक्रेत्यांनी पुकारलेल्या बेमुदत बंदचा आज तिसरा दिवस असून शहरासह संपूर्ण तालुक्यातील कृषी सेवा केंद्रे बंदच असल्याचे दिसून आले. शासनाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय किंवा भूमिका जाहीर न झाल्याने
बेमुदत बंदचा तिसरा दिवस; कृषी विक्रेते मागण्यांवर ठाम, शेतकरी अडचणीत


अमरावती, 29 एप्रिल (हिं.स.) : तालुक्यातील कृषी साहित्य विक्रेत्यांनी पुकारलेल्या बेमुदत बंदचा आज तिसरा दिवस असून शहरासह संपूर्ण तालुक्यातील कृषी सेवा केंद्रे बंदच असल्याचे दिसून आले. शासनाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय किंवा भूमिका जाहीर न झाल्याने आंदोलनकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, मंगळवार हा तिवसा शहराचा आठवडी बाजाराचा दिवस असल्याने तालुक्याच्या विविध भागांतून शेतकरी, व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने शहरात आले होते. मात्र कृषी सेवा केंद्रे बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि कीटकनाशके यांसारख्या अत्यावश्यक साहित्याची उपलब्धता झाली नाही. परिणामी अनेक शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागले असून नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या बंदचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या हंगामी कामांवर होत असून पेरणीपूर्व तयारीवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. योग्य वेळी साहित्य न मिळाल्यास आगामी हंगामावरही त्याचे परिणाम दिसून येऊ शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने हस्तक्षेप करून कृषी साहित्य विक्रेत्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकरी व नागरिकांकडून केली जात आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande