लातूरमध्ये हरभरा खरेदी केंद्रे बंद; १८०८ शेतकऱ्यांचा माल अडकला
लातूर, 29 एप्रिल (हिं.स.) : लातूर जिल्ह्यात हरभरा खरेदी प्रक्रियेत मोठा गोंधळ निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आडत बाजारात हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी केंद्रांकडे वळण घेतले होते. मात्र खरे
हरभरा खरेदी


लातूर, 29 एप्रिल (हिं.स.) : लातूर जिल्ह्यात हरभरा खरेदी प्रक्रियेत मोठा गोंधळ निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आडत बाजारात हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी केंद्रांकडे वळण घेतले होते. मात्र खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने जिल्ह्यातील २३ हमीभाव खरेदी केंद्रे अचानक बंद करण्यात आली असून संबंधित पोर्टलही बंद झाले आहे.

या निर्णयामुळे ऑनलाईन नोंदणी केलेल्या तब्बल १८०८ शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी होऊ शकलेला नाही. त्यामुळे हे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

जिल्ह्यात यंदा ३ लाख ३८ हजार ५८६ हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांचा पेरा झाला असून त्यापैकी २ लाख ८२ हजार ८५८ हेक्टरवर हरभऱ्याची लागवड करण्यात आली होती. सध्या शेतकरी काढणी झालेला हरभरा आडत बाजारात विक्रीसाठी आणत आहेत.

शासनाने हरभऱ्यासाठी ५,८७५ रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला असला तरी आडत बाजारात सध्या सरासरी ५,४५० रुपये दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३०० ते ४०० रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.

हमीभावाचा लाभ मिळावा म्हणून नाफेडमार्फत आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यात २३ केंद्रे सुरू करण्यात आली होती. या केंद्रांवर ५,९३१ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती, तर ५,६७२ शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे हरभरा विक्रीसाठी बोलावण्यात आले होते.

मात्र अचानक केंद्रे बंद झाल्याने उर्वरित शेतकऱ्यांचा माल अडकून पडला असून शासनाच्या या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

-------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande