
परभणी, 29 एप्रिल, (हिं.स.)। समाजसेवा व स्वकष्टाने जीवन जगणे हीच खरी ईश्वरभक्ती असून माणूस जन्माने नव्हे तर कर्माने मोठा ठरतो, असे प्रतिपादन व्याख्याते आशीष साडेगावकर यांनी केले.
सेलूतील श्री शंकरलिंग मंदिराच्या वतीने जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेवणआप्पा साळेगांवकर तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवलिंगआप्पा बोंधणे, देवस्थानचे अध्यक्ष अशोकआप्पा वाडकर यांची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना साडेगांवकर म्हणाले, सामाजिक समतेचा विचार करताना तू कोण आहेस? असे विचारू नये, तर प्रत्येकाला आपले मानावे, असा संदेश देत वीरशैव लिंगायत संप्रदायाचे प्रवर्तक, समता, बंधुता व श्रमाचे महत्त्व रुजवणारे महात्मा बसवेश्वर यांनी बाराव्या शतकातच स्त्री-पुरुष समानतेचा विचार मांडला. त्यांनी ‘अनुभव मंडप’ या जगातील पहिल्या संसदेसारख्या संकल्पनेतून सर्व समाजासाठी कार्य केले. जात ही मोठी नसून माणसाचे विचार मोठे असतात. माणुसकीचा धर्म सांगणारे बसव विचार आजही प्रत्येकाला आपलेसे वाटतात, असे साडेगावकर यांनी म्हटले.
प्रमुख अतिथी म्हणून बोलताना बोंधणे म्हणाले की, आपले कार्य करताना ते सत्कारणी लागेल असेच कार्य करावे. चुकीच्या व गैरसमजातून भक्ती न करता देवाला समर्पित अशी खरी भक्ती करावी. कोण काय सांगतो यापेक्षा शिवमहापुराण ग्रंथ वाचून त्यातील तत्वज्ञान समजून घ्यावे. आपण स्वतःच देव आहोत, हे प्रथम लक्षात घेत आत्मलिंग धारण करून पवित्र जीवन जगावे. जात-पोटजातींचा भेद न करता माणुसकीचा धर्म जपावा. प्रामाणिकपणा आणि कष्ट यांच्या जोरावर जीवन जगण्याचा संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात रेवणआप्पा साळेगावकर म्हणाले की, आपल्या धर्माचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. धर्माची शिकवण आणि आचरण जपणे हे वीरशैव लिंगायत समाजातील प्रत्येक व्यक्तीसाठी महत्त्वाचे आहे. समाजातील रूढी, परंपरा आणि प्रथा यांवर चिंतन-मनन करून पुढील पिढीला आदर्श देणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे.
या कार्यक्रमासोबत श्री शंकरलिंग मंदिर देवस्थान सेलू व मातोश्री ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात 27 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने करण्यात आली. देवस्थानच्या वतीने अध्यक्ष रेवणआप्पा साळेगावकर, प्रमुख अतिथी शिवलिंगआप्पा बोंधणे, व्याख्याते आशीष साडेगावकर तसेच देवस्थानचे अध्यक्ष अशोकआप्पा वाडकर यांचा सत्कार करण्यात आला.
--------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis