कोल्हापूरच्या स्वच्छतेत कसूर झाल्यास कारवाई :  डॉ. राजेंद्र भारूड
कोल्हापूर, 29 एप्रिल (हिं.स.) : शहरातील स्वच्छतेच्या कामकाजात कसूर झाल्यास संबंधित आरोग्य निरीक्षक व मुकादमांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिला. स्थायी समिती सभागृहात आज सका
आरोग्य निरीक्षक व मुकादमांची आढावा बैठक


कोल्हापूर, 29 एप्रिल (हिं.स.) : शहरातील स्वच्छतेच्या कामकाजात कसूर झाल्यास संबंधित आरोग्य निरीक्षक व मुकादमांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिला.

स्थायी समिती सभागृहात आज सकाळी 10.30 वाजता सर्व आरोग्य निरीक्षक व मुकादमांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी बोलताना आयुक्तांनी शहरात रस्त्यांवर कचरा साचल्याच्या तक्रारी वाढत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

प्रत्येक प्रभागातील स्वच्छतेची जबाबदारी निश्चित केली जाईल, तसेच ज्या भागात कचरा अधिक प्रमाणात आढळेल त्या ठिकाणच्या मुकादमांवर थेट कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांच्या तक्रारी कमी करणे आणि शहर स्वच्छ ठेवणे ही प्राथमिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

आरोग्य निरीक्षकांनी केवळ कार्यालयात न बसता प्रत्यक्ष क्षेत्रात जाऊन कामकाज पाहावे, असे निर्देशही त्यांनी दिले. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सकाळी 5 ते दुपारी 1 या वेळेत स्वच्छतेचे कामकाज करण्यावर सर्वानुमते सहमती झाली.

सध्या शहरात 1575 स्वच्छता कर्मचारी कार्यरत असून लवकरच नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणार आहे. तसेच नव्याने समाविष्ट भागांमध्ये स्वच्छता मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले.

स्वच्छ सर्वेक्षण 2026 मध्ये कोल्हापूर शहराने पहिल्या तीन क्रमांकात स्थान मिळवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहनही आयुक्तांनी केले. घरोघरी कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती वाढवण्यावर भर देण्यात आला असून कचरा संकलनासाठी QR कोड स्कॅनिंगचे प्रमाण 57 टक्क्यांवरून 80 टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त, उपआयुक्त, सहाय्यक आयुक्त तसेच सर्व विभागीय अधिकारी उपस्थित होते.

------------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande