
लातूर, 29 एप्रिल (हिं.स.) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे संस्थापक कुलगुरू तसेच थोर विचारवंत डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या नावाने विद्यापीठात 'अध्यासन केंद्र' स्थापन करण्यात यावे, तसेच विद्यापीठाच्या लातूर येथील उपकेंद्रात त्यांचे स्मारक उभारण्यात यावे, अशी महत्त्वपूर्ण मागणी आमदार रोहितदादा पवार यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीचे निवेदन देताना लातूर येथून ॲड. निशांत वाघमारे आणि संजय शेटे उपस्थित होते.
राज्यपालांना देण्यात आलेल्या निवेदनात डॉ. जनार्दन वाघमारे सरांच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव करण्यात आला आहे. डॉ. वाघमारे हे केवळ विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरूच नव्हते, तर मराठी भाषा, साहित्य, समीक्षा, शिक्षण, तसेच सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. मराठवाड्यासारख्या भागातील उच्च शिक्षणाचा पाया त्यांनी मजबूत केला. ग्रामीण आणि बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी दिलेले दूरदर्शी आणि पुरोगामी शैक्षणिक नेतृत्व कायम स्मरणात राहील, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
डॉ. जनार्दन वाघमारे यांचे साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदान अफाट आहे. त्यांचे वैचारिक मार्गदर्शन आणि वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. या उद्देशाने त्यांच्या स्मरणार्थ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात 'डॉ. जनार्दन वाघमारे अध्यासन केंद्र' तातडीने स्थापन करावे व याबाबत सर्व संबंधितांना योग्य ते आदेश द्यावेत, अशी विनंती आ. रोहित पवार यांनी केली आहे.अध्यासन केंद्रासोबतच, डॉ. वाघमारे यांच्या कार्याचा गौरव म्हणून विद्यापीठाच्या लातूर येथील उपकेंद्रात त्यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी विशेष मागणीही यावेळी करण्यात आली. या महत्त्वाच्या मागणीच्या वेळी लातूरचे प्रतिनिधी म्हणून ॲड. निशांत वाघमारे आणि संजय शेटे हे समवेत उपस्थितीत होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis