
अमरावती, 29 एप्रिल : मोर्शी येथून नागपूरला पाठविण्यात आलेल्या सेमी कंडक्टर (ऍल्युमिनियम कंडक्टर) मालाची तब्बल 17 लाख 81 हजार रुपयांची लूट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात तक्रारदाराचे अपहरण करून चाकूचा धाक दाखवत जबरदस्तीने व्यवहार पूर्ण करून माल लंपास केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारदार अलीम खान सलीम खान (वय 41, रा. पिंपळपुरा, मोर्शी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी 16 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, खामगाव (जि. बुलडाणा) यांच्या लिलावातून ऍल्युमिनियम कंडक्टरचा माल खरेदी केला होता. हा माल त्यांनी मोर्शी येथे आणल्यानंतर नागपूरमधील वानाडोंगरी परिसरातील एका स्टील कंपनीसोबत व्यवहार निश्चित केला.
यानुसार, सुमारे 4,870 ऍल्युमिनियम कंडक्टरचा 17,81,446 रुपयांचा माल ट्रकद्वारे नागपूरला पाठवण्यात आला. त्यानंतर अलीम खान स्वतः खासगी वाहनाने नागपूरला पोहोचले असता, संशयित नऊ जणांनी त्यांचे अपहरण केल्याचा आरोप आहे.
तक्रारीनुसार, आरोपींनी त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला, जीव मारण्याची धमकी दिली आणि चाकूचा धाक दाखवत जबरदस्तीने कागदपत्रांवर सही करून घेतली. यानंतर खोटी कागदपत्रे तयार करून संपूर्ण माल लंपास करण्यात आला.
या प्रकरणी मोर्शी पोलिसांनी महंमद नाजीम अली गुलाम खालिद खाँ (वय 40), असरार अहमद सफात खान (वय 40), वकील जीवन शुक्ला (वय 52), चांद (वय 48), इमरान, राकेश यांच्यासह अन्य चौघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.--------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी