
बीड, 29 एप्रिल (हिं.स.)।
शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० (पोखरा) राबविण्यात येत आहे. तथापि, योजनेचा प्रभावी लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी काही बाबींमध्ये सुधारणा आवश्यक असल्याचे निदर्शनास आले.
मतदारसंघातील आढावा बैठकीदरम्यान कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्राप्त माहितीनुसार आढळलेल्या त्रुटींबाबत मा. दत्ता मामा भरणे यांची भेट घेऊन लेखी निवेदन सादर करण्यात आले.सदर निवेदनात पुढील मुद्दे अधोरेखित करण्यात आले आहेत.
१) तुषार संच (Sprinkler) घटकासाठी अर्ज करताना एकाच गट क्रमांकामध्ये किमान १ हेक्टर क्षेत्र असण्याची अट लागू आहे. विविध गटांमधील एकत्रित क्षेत्र ग्राह्य न धरल्यामुळे पात्रतेवर परिणाम होत आहे.
महा DBT मार्गदर्शक सूचनांनुसार एकत्रित क्षेत्र ग्राह्य धरण्याची तरतूद आवश्यक आहे.
२) रेशीम घटकासाठी एकाच गट क्रमांकामध्ये किमान ४० आर क्षेत्राची अट निर्धारित आहे.
विविध गटांमधील एकत्रित क्षेत्र विचारात घेण्याची आवश्यकता आहे.
३) प्रकल्प टप्पा १.० मध्ये पाइपलाइन व मोटार घटकांचा लाभ सर्व समाजघटकांना उपलब्ध होता. टप्पा २.० मध्ये हा लाभ अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीपुरता मर्यादित आहे.
लाभाचा व्याप्ती सर्व समाजघटकांपर्यंत विस्तार करण्याची गरज आहे.
४) शेडनेट गृह घटकांतर्गत सध्या केवळ साहित्याकरिता अर्जाची सुविधा उपलब्ध आहे.
नवीन शेडनेट गृह उभारणीसाठीही लाभ मिळणे अपेक्षित आहे.
५) प्रकल्पाच्या पोर्टलवर फार्मर आयडीमध्ये क्षेत्राची अचूक नोंद प्रदर्शित होत नसून १.९९ असे क्षेत्र दर्शविले जात आहे.
८ अ नोंदीनुसार अचूक क्षेत्र नोंदविणे आवश्यक आहे.
वरील बाबींचा विचार करून आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis