नक्षलवादाविरोधात “जंगोम”च्या माध्यमातून जनजागृती
नाटकातून मांडली वीर बाबूराव शेडमाकेची जीवन कथा भामरागड, 29 एप्रिल (हिं.स.) : “आमचा हीरो कोण.. आदिवासींचे दमन करणारा की आदिवासींचे उत्थान करणारा ?” असा प्रभावी प्रश्न उपस्थित करत भामरागडमध्ये सादर झालेल्या “जंगोम : वॉर अगेन्स्ट हिप्नोटिक इल्ल्युजन”
“जंगोम” नाटकातील एक दृष्य


नाटकातून मांडली वीर बाबूराव शेडमाकेची जीवन कथा

भामरागड, 29 एप्रिल (हिं.स.) : “आमचा हीरो कोण.. आदिवासींचे दमन करणारा की आदिवासींचे उत्थान करणारा ?” असा प्रभावी प्रश्न उपस्थित करत भामरागडमध्ये सादर झालेल्या “जंगोम : वॉर अगेन्स्ट हिप्नोटिक इल्ल्युजन” या दोन अंकी मराठी नाटकाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. नाट्यप्रयोगादरम्यान प्रेक्षकांनी “वीर बाबुराव की जय” अशा घोषणांनी प्रतिसाद देत माओवादाच्या भ्रामक प्रभावातून बाहेर पडल्याची भावना व्यक्त केली.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड यांच्या वतीने आणि महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने हा नाट्यप्रयोग भगवंतराव आश्रम शाळेच्या पटांगणात रविवारी (26 एप्रिल रोजी) सादर करण्यात आला. डॉ. दंदे फाऊंडेशन निर्मित आणि हेमेंदू रंगभूमी प्रस्तुत या नाटकाचा हा 21 वा प्रयोग होता. भामरागड परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नाटकाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या नाटकात 1857 च्या स्वातंत्र्यलढ्याचा ऐतिहासिक संदर्भ घेत वर्तमानातील माओवादाशी संबंधित संघर्षाचे चित्रण करण्यात आले. दंडकारण्यातील नायक वीर बाबुराव शेडमाके यांच्या संघर्षाची कथा मांडत, त्यांनी इंग्रजांविरोधात दिलेल्या लढ्याप्रमाणेच आजच्या काळातही संविधानाच्या आधारावर माओवादाविरोधात लढण्याची प्रेरणा नाटकातून दिली गेली.तसेच माओवादी चळवळीतील घटनांचा संदर्भ देत काही पात्रांद्वारे हिंसक घटनांचे आणि त्यामागील क्रौर्याचे नाट्यमय चित्रण करण्यात आले. नाटकाच्या माध्यमातून आदिवासी समाजात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

या प्रयोगाबद्दल उपस्थितांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड आणि महाराष्ट्र पोलिसांचे आभार मानले. नाटकाचे लेखन प्रवीण खापरे यांनी केले असून दिग्दर्शन शुभम निकम यांनी केले आहे. व्यवस्थापनाची जबाबदारी अजिंक्य थेर यांनी सांभाळली. नाटकात वीर बाबुराव शेडमाके यांच्या भूमिकेत अनुप बहाड, भुरीया भूमकालच्या भूमिकेत मयूर मस्के, तर इतर भूमिकांमध्ये शुभम निकम, धनश्री, शुभम गुरनुले, कृष्णा मस्के, करुणा मंगदे आणि सतीश बगडे यांनी अभिनय साकारला.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande