
अमरावती, 29 एप्रिल (हिं.स.)
अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे यांनी प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्यावर जोरदार टीका करत राजकीय वातावरण तापवले आहे. बच्चू कडू हे सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, अशी बोचरी प्रतिक्रिया देत तायडे यांनी त्यांच्या राजकारणावर थेट हल्ला चढवला.आमदार तायडे म्हणाले की, “गेल्या २० वर्षांपासून बच्चू कडू हे सतत सत्तेत राहिले आहेत. जनतेने त्यांना भरभरून प्रेम दिले, मात्र त्यांच्या सत्तेची भूक अजूनही संपलेली नाही. जशी मासोळी पाण्याशिवाय राहू शकत नाही, तशी त्यांची अवस्था सत्तेविना झाली आहे.” या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.यापुढे बोलताना तायडे यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या पक्षाचा या सर्व घडामोडींशी काहीही संबंध नाही. “जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब घेतील,” असे ते म्हणाले. मात्र, शिंदे यांनी ऑफर दिल्यानंतर बच्चू कडू स्वतःहून त्यांच्या पायाशी गेले का, हा नंतरचा मुद्दा असल्याचे सांगत त्यांनी कडू यांच्यावर उपरोधिक टीका केली.आमदार तायडे यांनी आणखी कठोर शब्दांत आरोप करत म्हटले की, “पायात जाऊन पडण्याची त्यांना सवयच आहे. स्वतःचे भले कसे करून घ्यायचे, यामध्ये ते माहिर आहेत.” त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वातावरण अधिकच तापले असून, दोन्ही बाजूंमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू होण्याची शक्यता आहे.तसेच, बच्चू कडू यांचा “दुतोंडी स्वभाव” संपूर्ण महाराष्ट्राला माहिती असल्याचा आरोप करत तायडे म्हणाले की, “आजपर्यंत त्यांनी स्वतःचे राजकारण जिवंत ठेवण्यासाठी आणि अस्तित्व टिकवण्यासाठीच धडपड केली आहे.”या तीव्र शब्दांत केलेल्या टीकेमुळे प्रहार संघटनेकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमध्ये या वादाचा पुढे काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी