
अमरावती, 29 एप्रिल (हिं.स.) : आकाशातून जणू आग ओकणारा सूर्य आणि दिवसेंदिवस वाढत चाललेले तापमान अशा जीवघेण्या उकाड्यातही अचलपूर-परतवाडा शहरासह तालुक्यात काही खाजगी कोचिंग क्लासेस व अवैध खासगी शिकवणी वर्ग सकाळी दहा वाजेनंतर सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची कोणतीही तमा न बाळगता केवळ आर्थिक फायद्यासाठी हे वर्ग सुरू ठेवले जात असल्याने पालकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. कडक उन्हात विद्यार्थ्यांना घराबाहेर पडून क्लासला जाण्याची सक्ती होत असून, त्यामुळे उष्माघात, निर्जलीकरण आणि थकवा यांसारख्या गंभीर आरोग्य समस्यांचा धोका वाढत आहे.
विशेषतः लहान मुले आणि किशोरवयीन विद्यार्थ्यांवर या परिस्थितीचा विपरीत परिणाम होत असल्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे. “शिक्षण महत्त्वाचे असले तरी विद्यार्थ्यांचे आरोग्य त्याहून अधिक महत्त्वाचे आहे,” अशी भूमिका अनेकांनी मांडली आहे.
या पार्श्वभूमीवर शिकवणी वर्गांच्या वेळांमध्ये तातडीने बदल करण्याची मागणी जोर धरत आहे. सकाळी ६ ते ९ आणि संध्याकाळी ६ नंतरच वर्ग घेण्यात यावेत, अशी मागणी पालक व सुजाण नागरिकांकडून केली जात आहे.
यासोबतच, कोणतीही अधिकृत परवानगी न घेता सुरू असलेल्या अवैध शिकवणी वर्गांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशीही मागणी होत आहे. शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अशा बेजबाबदार प्रकारांना आळा बसणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, संबंधित प्रशासन, शिक्षण विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोचिंग क्लासेसवर कारवाई करावी, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी