हरिनाम सप्ताह देणगी प्रकरणी तक्रार; कोट्यवधींच्या गैरव्यवहाराचा आरोप, चौकशीची मागणी
लातूर, 29 एप्रिल (हिं.स.)। जिल्ह्यातील खंडापूर शिवारात पार पडलेल्या हरिनाम सप्ताहाच्या देणगी हिशोबावरून मोठा वाद उभा राहिला असून, या प्रकरणी संबंधितांविरोधात पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. देणगी रकमेचा अपहार, फसवणूक, धमकी व द
गैरव्यवहार


लातूर, 29 एप्रिल (हिं.स.)।

जिल्ह्यातील खंडापूर शिवारात पार पडलेल्या हरिनाम सप्ताहाच्या देणगी हिशोबावरून मोठा वाद उभा राहिला असून, या प्रकरणी संबंधितांविरोधात पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. देणगी रकमेचा अपहार, फसवणूक, धमकी व दिशाभूल केल्याचे गंभीर आरोप या तक्रारीत करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, २२ फेब्रुवारी ते २ मार्च २०२६ या कालावधीत खंडापूर परिसरात हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक सोहळ्यासाठी विविध भागांतून वारकरी, कीर्तनकार व भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या दरम्यान मोठ्या प्रमाणात देणगी जमा झाल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.

तक्रारीनुसार, कार्यक्रमाच्या आयोजनात सहभागी असलेल्या काही व्यक्तींनी देणगी संकलन व आर्थिक व्यवहार स्वतःकडे ठेवत इतरांना कोणतीही माहिती दिली नाही. तसेच सर्व व्यवहार पारदर्शक न ठेवता “प्रति शिर्ष” पद्धतीने रक्कम हाताळल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे जमा झालेल्या निधीचा स्पष्ट हिशोब आजपर्यंत सादर करण्यात आलेला नसल्याचा दावा करण्यात येत आहे.

तसेच, जमा झालेल्या देणगीतील काही रक्कम नियोजित धार्मिक कार्यासाठी—विशेषतः भंडारा डोंगर येथील संत तुकाराम महाराज मंदिरासाठी—वापरण्याचे ठरले होते, मात्र त्या ठिकाणी एकही रुपया पोहोचला नसल्याचा आरोप तक्रारीत नमूद आहे.

या सर्व प्रकाराला विश्वासघात, आर्थिक अपहार व फसवणूक असल्याचे म्हणत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तक्रारदारांनी पुढील मागण्या केल्या आहेतः

संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी

संबंधित आरोपींवर फसवणूक, अपहार व धमकीचे गुन्हे दाखल करावेत

सर्व आर्थिक व्यवहारांची तपासणी करून रक्कम परत मिळवून द्यावी

संबंधितांना तात्काळ अटक करावी

दरम्यान, या प्रकरणामुळे धार्मिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande