परभणीत उष्णतेमुळे इलेक्ट्रिक स्कूटरला आग; मोठा अनर्थ टळला
परभणी, 29 एप्रिल (हिं.स.)। शहरातील शिवराम नगर परिसरात उष्णतेच्या तीव्रतेमुळे इलेक्ट्रिक स्कूटरला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीत स्कूटर पूर्णतः जळून खाक झाली असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. शिवरा
परभणीत उष्णतेमुळे इलेक्ट्रिक स्कूटरला आग; मोठा अनर्थ टळला


परभणी, 29 एप्रिल (हिं.स.)।

शहरातील शिवराम नगर परिसरात उष्णतेच्या तीव्रतेमुळे इलेक्ट्रिक स्कूटरला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीत स्कूटर पूर्णतः जळून खाक झाली असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

शिवराम नगर येथील सौ. मीना मधुसूदन जैन या बाजारातून घरी परतल्या. त्यांनी त्यांची ओकिनावा कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर घराच्या कंपाऊंड भिंतीलगत उभी करून घरात प्रवेश केला. त्यानंतर साधारण अर्ध्या तासातच स्कूटरने अचानक पेट घेतला. आगीने काही क्षणातच भीषण रूप धारण केले आणि स्कूटर पूर्णपणे जळून खाक झाली. घटनेच्या वेळी परिसरात इतर कोणतीही वाहने नसल्याने मोठा अनर्थ टळला. विशेष म्हणजे, संबंधितांची कार त्यांच्या पतींनी बाहेर नेल्यामुळे संभाव्य मोठे नुकसान टाळले गेले.

दरम्यान, या घटनेमुळे उन्हाळ्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. तज्ज्ञांच्या मते, अत्याधिक तापमानात इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीवर ताण येऊ शकतो, ज्यामुळे आग लागण्याचा धोका वाढतो. त्यामुळे नागरिकांनी विशेष दक्षता बाळगणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात दुपारी 11 ते सायंकाळी 6 या कालावधीत इलेक्ट्रिक स्कूटरचा वापर टाळावा, वाहन थेट उन्हात पार्क न करता सावलीत ठेवावे, तसेच बॅटरी चार्ज करताना ओव्हरचार्जिंग टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande