
अमरावती, 29 एप्रिल (हिं.स.) : राज्यातील शैक्षणिक वर्ष 2026-2027 साठी अकरावी प्रवेश प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून, यंदा ही संपूर्ण प्रक्रिया पाच टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. शालेय शिक्षण विभागाने 27 एप्रिल 2026 रोजी याबाबत अध्यादेश जारी केला आहे.
नवीन नियमानुसार अकरावीचे प्रवेश यंदाही गुणवत्तेच्या आधारे ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहेत. पहिल्या तीन फेऱ्या नियमित असतील, त्यानंतर मुलींसाठी स्वतंत्र विशेष फेरी घेण्यात येणार आहे. अंतिम टप्प्यात सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली प्रत्यक्ष प्रवेश फेरी राबविण्यात येणार असून त्यानंतर एकूण पाच फेऱ्यांमध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल.
व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ऑफलाईन प्रवेश
या वर्षापासून एचएसव्हीसी (व्यावसायिक) अभ्यासक्रमांचे प्रवेश थेट शाळा स्तरावर ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. तसेच आदिवासी, सामाजिक न्याय व इतर विभागांच्या राज्य मंडळ संलग्न शाळांना संबंधित विभाग प्रमुखांची मान्यता मिळाल्यासच प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येईल. ही मान्यता 30 एप्रिल 2026 पूर्वी घेणे बंधनकारक आहे.
नवीन सुविधा आणि नियम
विद्यार्थ्यांना कला, वाणिज्य किंवा विज्ञान या शाखांपैकी एका शाखेची निवड एका अर्जाद्वारे करता येणार आहे. मात्र प्रत्येक फेरीत शाखा बदलण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश अंतिम फेरीपर्यंत सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.
कठोर पारदर्शकता नियम
प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. बनावट कागदपत्रे सादर केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच दहावीच्या गुणपत्रिकेत फेरफार आढळल्यास संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतून अपात्र ठरविण्यात येईल.
शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. तसेच अकरावीचे वर्ग 15 जुलैपर्यंत सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी