
निफाड, 29 एप्रिल, (हिं.स.)। द्राक्ष पंढरी असलेल्या निफाड तालुक्यात कृषी औषधे, बी-बियाणे, खत विक्रेते यांच्या बेमुदत संपाचा फटका आधीच गलितगात्र झालेल्या शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे.
संपामुळे शेतकऱ्यांना गत दोन दिवसापासून शेतीसाठी लागणारे औषधे, खते, बी-बियाणे मिळत - नसल्याने अस्मानी-सुलतानी संकटांनी बेजार असलेल्या - शेतकऱ्याला परत या संपाचा सामना करावा लागत आहे. संप कधी मिटणार? याबाबत निफाड तालुक्यात शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. कृषी दुकानदारांच्या मागण्या शासनाने तत्काळ मान्य करून हा संप त्वरित मिटवावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. याबाबत शासन व प्रशासन मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय निर्णय घेऊन शेतकऱ्यांना व कृषी विक्रेत्यांना दिलासा देते, यावरच या संपाचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर याचा फटका बसून द्राक्षबागांची एप्रिल छाटणी केल्यामुळे त्यांना लागणारी कृषी औषधे व खते दोन दिवसापासून मिळत नसल्याने याचा मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. महसूल प्रशासनाचा संप सुरू होता, त्याचा फटका शेतकऱ्यांना बसून कर्ज प्रकरणांसाठी लागणा-या कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने काही शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळाले नाही. आता कृषी विक्रेत्यांचा संप सुरू झाल्याने त्यात उन्हाचा फटका बसत असल्याने शेतक-यांनी जगायचे कसे? असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा आहे.
राज्य व केंद्र शासनाने आधीच कृषी औषधांचे दर गगनाला भिडले आहे. त्यात खतेही मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी शेतीसाठी जगायचे कसे? अशी गंभीर समस्या निर्माण झाली आहे. याबाबत प्रशासन व शासन काय भूमिका घेते, याकडे निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV