
परभणी, 29 एप्रिल (हिं.स.)।
जालना-नांदेड समृद्धी महामार्गासाठी सुरू असलेल्या सक्तीच्या भूसंपादन प्रक्रियेविरोधात सेलू तालुक्यातील शेतकर्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाकडून हुकूमशाही पद्धतीने आणि अत्यल्प दरात जमिनी संपादन केल्या जात असल्याचा आरोप करत, शेतकर्यांनी उपविभागीय अधिकार्यांना निवेदन सादर केले.
शेतकर्यांच्या मते, प्रस्तावित महामार्गासाठी त्यांच्या सुपीक शेतीजमिनी तसेच फळबागा संपादित केल्या जात आहेत. मात्र, त्यासाठी केवळ 18 लाख 80 हजार रुपये प्रति हेक्टर इतकाच मोबदला देण्यात येत असून, हा दर बाजारभावाच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रेडी रेकनर दर म्हणजे प्रत्यक्ष बाजारभाव नव्हे, याची जाणीव प्रशासनाने ठेवावी, अशी ठाम भूमिका शेतकर्यांनी मांडली.
यावेळी प्रशासनाने लोकशाही पद्धतीने चर्चा न करता जबरदस्तीने निर्णय लादल्यास हा प्रकार शेतकर्यांच्या विरोधाला सामोरा जाईल, असा इशाराही देण्यात आला. हा अन्यायकारक निर्णय आम्ही हाणून पाडू आणि गरज पडल्यास तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. तसेच, योग्य तोडगा निघेपर्यंत भूसंपादनाची पुढील प्रक्रिया तातडीने थांबवावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. या निवेदनावर रामेश्वर गाडेकर, अनिरुद्ध नाईक, दत्ता देशमाने, प्रशांत नाईक यांच्यासह अनेक शेतकर्यांच्या स्वाक्षर्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis