
अमरावती, 29 एप्रिल (हिं.स.) : संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत अंजनगाव तालुक्यातील घोडसगाव ग्रामपंचायतीने उल्लेखनीय यश मिळवले आहे. सन 2025-26 साठी अमरावती विभागातून घोडसगावला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला असून, या कामगिरीमुळे गावाने राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयाकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे. शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत ही स्पर्धा दरवर्षी गट, जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर आयोजित केली जाते. या स्पर्धेत पाणी गुणवत्ता, पाणी व्यवस्थापन, स्वच्छता उपक्रमांची अंमलबजावणी, घन व द्रव कचरा व्यवस्थापन, शौचालय वापराची स्थिती तसेच ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग या निकषांवर मूल्यमापन केले जाते.
घोडसगाव ग्रामपंचायतीने स्वच्छतेबाबत व्यापक जनजागृती करत शाश्वत उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. घराघरात शौचालयांचा वापर सुनिश्चित करणे, नियमित स्वच्छता मोहिमा राबविणे, कचरा व्यवस्थापनाची कार्यक्षम व्यवस्था उभारणे आणि पाणीपुरवठा प्रणालीचे सुयोग्य नियोजन यामुळे गावाने हे यश मिळवले आहे.
या यशाबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब रायबोले तसेच पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी यांनी ग्रामपंचायतीचे अभिनंदन केले आहे. इतर गावांनीही घोडसगावच्या कार्यपद्धतीचा आदर्श घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
घोडसगावची सातत्यपूर्ण कामगिरी
यापूर्वीही घोडसगाव ग्रामपंचायतीने विविध स्वच्छता अभियानांत उल्लेखनीय यश मिळवले आहे. या वर्षी गटस्तरावर प्रथम, जिल्हास्तरावर प्रथम आणि विभागस्तरावर द्वितीय क्रमांक मिळवत एकूण 15 लाख 60 हजार रुपयांच्या पुरस्कार निधीसाठी ग्रामपंचायत पात्र ठरली आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी