
कोल्हापूर, 29 एप्रिल (हिं.स.) : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक महायुती म्हणूनच लढवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईतील ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि. 28) रात्री महायुतीतील प्रमुख नेत्यांची सुमारे दीड तास बैठक झाली. या बैठकीला चंद्रकांत पाटील, प्रकाश आबीटकर, हसन मुश्रीफ, धनंजय महाडीक यांच्यासह अनेक आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसंदर्भातील नव्या कायद्यावर सविस्तर चर्चा झाली. या कायद्यातील अडचणी आणि त्यावरील उपाययोजना याबाबत विविध नेत्यांनी आपली मते मांडली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही निवडणूक तातडीने जाहीर करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून, कायदेशीर अडचणींवर तोडगा काढण्यासाठी कायदे सल्लागारांची बैठक बोलावली असल्याचेही सांगण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व नेत्यांना महायुती म्हणूनच निवडणूक लढवण्याचे निर्देश दिल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. तसेच, सध्या अपुऱ्या माहितीतून पसरत असलेल्या बातम्या आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही त्यांनी आवाहन केले.
आगामी 4 मे 2026 रोजी परिस्थिती अधिक स्पष्ट होईल, त्यामुळे कोणत्याही गैरसमजाला वाव देऊ नये, असेही त्यांनी शेवटी नमूद केले.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar