सेलूतील हरभरा खरेदी ठप्प; ‘बजेट लिमिट’मुळे शेतक-यांमध्ये संताप
परभणी, 29 एप्रिल (हिं.स.)। शेतकरी एकीकडे निसर्गाच्या लहरीपणाशी झुंज देत असताना आता शासकीय तांत्रिक अडचणींमुळे नव्या संकटाला सामोरे जात आहेत. पुष्पकेशर फार्मर प्रोड्युसर कंपनी अंतर्गत सुरू असलेल्या हरभरा खरेदी केंद्रावर पोर्टलवर ‘बजेट लिमिट एक्झीड’
सेलूतील हरभरा खरेदी ठप्प; ‘बजेट लिमिट’मुळे शेतक-यांमध्ये संताप


परभणी, 29 एप्रिल (हिं.स.)। शेतकरी एकीकडे निसर्गाच्या लहरीपणाशी झुंज देत असताना आता शासकीय तांत्रिक अडचणींमुळे नव्या संकटाला सामोरे जात आहेत. पुष्पकेशर फार्मर प्रोड्युसर कंपनी अंतर्गत सुरू असलेल्या हरभरा खरेदी केंद्रावर पोर्टलवर ‘बजेट लिमिट एक्झीड’ असा संदेश दिसू लागल्याने खरेदी प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी, केंद्रावर उपस्थित शेतकर्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

शासकीय परिपत्रकानुसार 2025-26 या हंगामासाठी हरभरा खरेदी सुरू राहणार आहे. मात्र, या कालावधीत सुमारे 20 दिवस बारदाना (पोते) उपलब्ध नसल्यामुळे खरेदी प्रक्रिया आधीच रखडली होती. नुकतेच दोन दिवसांपूर्वी बारदाना उपलब्ध झाल्यानंतर शेतकर्यांना संदेश पाठवून खरेदी पुन्हा सुरू करण्यात आली होती.

या तांत्रिक अडथळ्यामुळे खरेदी तात्काळ थांबवावी लागली, ज्यामुळे शेतकर्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत पुष्पकेशर फार्मर प्रोड्युसर कंपनीने राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांना पत्राद्वारे विनंती केली आहे. बारदानाच्या तुटवड्यामुळे आधीच शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले असून आता पोर्टल बंद झाल्याने आर्थिक अडचणी अधिक वाढत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून तांत्रिक अडचण दूर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, शेतकर्यांकडे माल तयार असूनही पोर्टलच्या अडचणीमुळे खरेदी रखडली आहे. ही समस्या तातडीने सोडवली नाही तर शेतकर्यांचा रोष तीव्र होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया पुष्पकेशर फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या व्यवस्थापन समितीने व्यक्त केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande