जळगावात धावती स्कुटी जळून खाक, दोघे थोडक्यात बचावले
जळगाव , 29 एप्रिल (हिं.स.) जिल्ह्यात सध्या सूर्याचा प्रकोप पाहायला मिळत असून तापमानाचा पारा ४४ अंशांवर पोहोचला आहे. या कडक उन्हाच्या झळा बसत असतानाच, शहरात शिरसोली नाका परिसरात एका धावत्या दुचाकीने (अॅक्टिव्हा) अचानक पेट घेतल्याची थरारक घटना दुपार
जळगावात धावती स्कुटी जळून खाक, दोघे थोडक्यात बचावले


जळगाव , 29 एप्रिल (हिं.स.) जिल्ह्यात सध्या सूर्याचा प्रकोप पाहायला मिळत असून तापमानाचा पारा ४४ अंशांवर पोहोचला आहे. या कडक उन्हाच्या झळा बसत असतानाच, शहरात शिरसोली नाका परिसरात एका धावत्या दुचाकीने (अॅक्टिव्हा) अचानक पेट घेतल्याची थरारक घटना दुपारी घडली. या आगीत दुचाकी जळून खाक झाली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.मेहरूण परिसरातील रामेश्वर कॉलनीचे रहिवासी योगेश महाजन (वय ४६) आणि हितेन महाजन (वय १८) हे दुपारी अडीचच्या सुमारास शिरसोली नाका येथील शिवाजी उद्यान रस्त्यावरून जात होते. यावेळी अचानक गाडीतून ठिणगी उडाली आणि काही क्षणातच आगीचा भडका उडाला. गाडीने पेट घेतल्याचे लक्षात येताच दोघांनीही तत्काळ गाडीवरून उड्या मारल्या, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि त्यांचे प्राण वाचले.दुपारची वेळ असल्याने आणि तापमान ४३ अंशांहुन अधिक असल्याने इंजिन तसेच वायरिंगवर अतिरिक्त ताण येऊन हा तांत्रिक बिघाड झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. भररस्त्यात लागलेल्या या आगीमुळे येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांमध्ये धावपळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मदतीसाठी सरसावले. त्यांनी तातडीने प्रयत्न करून आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत अॅक्टिव्हाचा बराचसा भाग जळून खाक झाला होता. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande