म्हाडा मुंबई मंडळातर्फे २६४० सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज सादरीकरण, अनामत रकमेचा भरणा प्रक्रियेला मुदतवाढ
* १४ मे रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत; प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत ५ जून रोजी मुंबई, 29 एप्रिल (हिं.स.) : म्हाडा मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या मुंबईतील विवध गृहनिर्माण प्रकल्पांमधील २६
म्हाडा


* १४ मे रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत; प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत ५ जून रोजी

मुंबई, 29 एप्रिल (हिं.स.) : म्हाडा मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या मुंबईतील विवध गृहनिर्माण प्रकल्पांमधील २६४० सदनिकंच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडत प्रणालीमधील ऑनलाईन अर्ज नोंदणी, अर्ज स्वीकृती व अनामत रकमेचा ऑनलाईन भरणा प्रक्रियेला दि. १४ मे, २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या सुधारीत वेळापत्रकानुसार इच्छुक अर्जदार दि. १४ मे, २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकतील व १५ मे २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अनामत रकमेचा ऑनलाईन भरणा करू शकतील. तसेच दि. १५ मे, २०२६ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS / NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येणार आहे.

दि. २२ मे, २०२६ रोजी दुपारी ०३.०० वाजता सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. दि. २५ मे, २०२६ रोजी दुपारी ०३.०० वाजेपर्यंत प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे-हरकती दाखल करता येणार आहेत. दि. २९ मे, २०२६ रोजी दुपारी ०३.०० वाजता सोडतीसाठी स्विकृत अर्जांची अंतिम यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. सदनिकांच्या वितरणाकरिता प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत ५ जून, २०२६ रोजी जाहीर करण्यात येणार आहे. सोडतीचे स्थळ मंडळातर्फे लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

मुंबई मंडळातर्फे दि. ३० मार्च, २०२६ रोजी मुंबईतील कन्नमवार नगर-विक्रोळी, पत्राचाळ सिद्धार्थ नगर-गोरेगाव, जुने मागाठाणे-बोरीवली, गोराई-बोरीवली, सुभाष नगर-चेंबुर, गांधीनगर- वांद्रे, पंतनगर-घाटकोपर, गिरगाव, वडाळा, कोपरी-पवई, माझगाव, तुंगा पवई, लोकमान्य नगर-दादर, पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा आदी गृहनिर्माण प्रकल्पांमधील विविध उत्पन्न गटांतील २६४० सदनिकांच्या विक्रीकरिता संगणकीय सोडत जाहीर करण्यात आली.

यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी (Economically Weaker Section) १४५ सदनिका, अल्प उत्पन्न गटासाठी (Lower Income Group)८५८ सदनिका, मध्यम उत्पन्न गटासाठी (Middle Income Group) १४०८ सदनिका, उच्च उत्पन्न गटासाठी (Higher Income Group) २२९ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सोडतीत म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे बांधकाम सुरू असलेल्या १७६२ सदनिका, विकास नियंत्रण नियमावली ३३ (५) अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून विकासकांकडून गृहसाठा (Housing Stock) म्हणून म्हाडाला प्राप्त ३७१ सदनिका, विकास नियंत्रण नियमावली ३३ (७) अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून विकासकांकडून गृहसाठा (Housing Stock) म्हणून म्हाडाला प्राप्त १८८ सदनिका तसेच मुंबई मंडळाच्या मागील सोडतींमधील विविध कारणांमुळे रिक्त राहिलेल्या विकास नियंत्रण नियमावली ३३ (५), ३३ (७) व ५८ अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून विकासकांकडून गृहसाठा (Housing Stock) म्हणून म्हाडाला प्राप्त व मंडळाच्या विखुरलेल्या ३१९ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.

जाहीर सोडतीतील सदनिकांच्या किंमती म्हाडाच्या प्रचलित धोरणानुसार निश्चित करण्यात आल्या आहेत. तसेच विकास नियंत्रण नियमावली ३३ (५), ३३ (७) व ५८ अंतर्गत विकासकांकडून प्राप्त सदनिका 'जशा आहे त्या स्थितीमध्ये' विक्रीकरिता उपलब्ध आहेत. म्हाडातर्फे या सदनिकांची ताबा देण्यापूर्वी डागडुजी, दुरूस्ती करून दिली जाईल. तसेच यशस्वी अर्जदाराला सोडतीत लागलेल्या सदनिकेचा मालमत्ता कर व सहकारी गृहनिर्माण संस्थेचा देखभाल खर्च थकीत असल्यास म्हाडातर्फे त्याची अदायगी करूनच सदनिकेचा ताबा यशस्वी अर्जदारांना दिला जाणार आहे.

सदनिका विक्री करिता मंडळाकडे निश्चित साचेबद्ध कार्यप्रणाली कार्यरत आहे. म्हाडाचे अधिकृत संकेतस्थळ https://housing.mhada.gov.in व IHLMS 2.0 Integrated Mhada Housing Lottery System मोबाइल ॲप या संगणकीय प्रणालीद्वारेच म्हाडाच्या सोडतीमध्ये अर्ज करावा. अँड्रॉइड (android) अथवा आयओएस (ios) या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिमवर अनुक्रमे गूगल ड्राइव्हच्या प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरमध्ये IHLMS 2.0 Integrated Mhada Housing Lottery System या नावे मोबाइल ॲप उपलब्ध आहे.

सोडत प्रक्रियेत नोंदणी करणे, आवश्यक कागदपत्रे सादर करणे, कागदपत्रांची पात्रता पडताळणी करणे, अर्ज करणे ते अनामत रकमेचा भरणा व सोडतीत घर लागल्यावर सदनिकेच्या रकमेचा भरणा करणे या सर्व बाबी पूर्णतः ऑनलाइन असल्याने अर्जदारांना म्हाडा कार्यालयात यावे लागणार नाही. अशाप्रकारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ही प्रणाली मानवी हस्तक्षेपविरहीत अत्यंत पारदर्शक, फेसलेस आहे. तसेच ही प्रणाली वेळोवेळी स्वयंचलित अद्ययावत होत आहे. करिता अर्जदारांनी कोणत्याही अनधिकृत व्यक्तीशी परस्पर आर्थिक व्यवहार करू नये आणि तसे केल्यास मंडळ अथवा म्हाडा प्रशासन जबाबदार राहणार नाही. नागरिकांना सोडतीत सहभाग घेण्याकरिता नोंदणी प्रक्रिया अमर्याद खुली राहणार आहे. नोंदणी प्रक्रियेनंतर अर्जदाराचे कायम स्वरूपी प्रोफाइल नूतन संगणकीय सोडत प्रणालीमध्ये तयार होणार आहे. अर्जदारांच्या अर्जाची अचूक पडताळणी या प्रणालीद्वारे त्वरित होणार आहे.

मंडळातर्फे नागरिकांना असेही आवाहन करण्यात येत आहे की सोडत प्रक्रियेबाबत कोणी व्यक्ति/ दलाल काही प्रलोभने देऊन फसवणूक करीत असल्याचे आढळल्यास त्यांनी म्हाडाच्या मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी तसेच उपमुख्य अधिकारी (पणन) मुंबई मंडळ यांचे कार्यालयास कळवावे. अर्जदारांनी सोडतीविषयक सविस्तर माहितीसाठी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचे अवलोकन करणे आवश्यक आहे. अर्ज करतेवेळी अर्जदारांना येणाऱ्या अडचणींसाठी मार्गदर्शनासाठी ०२२-६९४६८१०० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई मंडळातर्फे करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande