
जालना, 29 एप्रिल (हिं.स.) - शहरातील गोपालपुरा भागात मूलभूत सुविधांच्या उन्नतीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या विशेष प्रयत्नातून मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत संपूर्ण गोपालपुरा परिसरात नवीन पाईपलाईन टाकण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचे स्वागत केले.
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांशी संवाद साधताना आमदार अर्जुनराव खोतकर यांनी सांगितले की, गोपालपुरा परिसरातील नागरिकांना दीर्घकाळापासून पाणीपुरवठ्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. नवीन पाईपलाईनमुळे या समस्या मोठ्या प्रमाणात सुटणार असून नागरिकांना नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा मिळणार आहे.
यावेळी पुढे बोलताना त्यांनी असेही नमूद केले की, जालना शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एक सुसूत्र विकास आराखडा तयार करण्यात आला असून त्या दिशेने नियोजनबद्ध मार्गक्रमण सुरू आहे. शहरातील नागरिकांना सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात असून येणाऱ्या काळात अधिक विकासकामे हाती घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रसंगी मनपा उपमहापौर राजेश राऊत, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख भास्कर आंबेकर, युवासेना सचिव अभिमन्यू खोतकर, मनपा विरोधी पक्षनेते कमलेश खरे, रणजीत मगरे, यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी या योजनेमुळे परिसराचा सर्वांगीण विकास होईल, असा विश्वास व्यक्त केला. गोपालपुरा परिसरातील नागरिकांनीही या कामाबद्दल समाधान व्यक्त करत प्रशासन व लोकप्रतिनिधींचे आभार मानले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis