
पुणे, 29 एप्रिल (हिं.स.)। पुणे शहराच्या प्रथम नागरिक राहत असलेल्या महापौर बंगल्यातील २० झाडांवर कुऱ्हाड चालविण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. केवळ धोकादायक झालेल्या फांद्या न तोडता अनेक वृक्ष अर्ध्यापर्यंत तोडण्यात आल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. झाडे लावा, झाडे जगवा यासाठी राज्य सरकार आणि पुणे महापालिका दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च करते. तर दुसरीकडे शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौर यांच्या निवासस्थानातील झाडे अशी नियमबाह्य पद्धतीने तोडली जात असतील तर करायचे काय ? असा सवाल शहरातील वृक्ष प्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.
या प्रकाराबद्दल वृक्षप्रेमींनी नाराजीही व्यक्त केली आहे. घोले रस्त्यावर पुणे महापालिकेच्या महापौरांचे निवासस्थान आहे. हा बंगला पुणे महापालिकेने बांधला असून बंगल्याच्या आजूबाजूला अनेक झाडे लावण्यात आली आहेत. या झाडांना कीड लागल्याचे कारण पुढे करून महापौर बंगल्यातील २० झाडांची छाटणी करण्यात आली. मात्र, ती कशासाठी, याचे कारण स्पष्ट झाले नसल्याने त्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.नियमानुसार, वृक्ष धोकादायक झाले असतील आणि कोणाच्या जीविताला धोका निर्माण होत असेल, तर अशा झाडांच्या फांद्या ठराविक आकारात कापण्याचे काम महापालिकेकडून केले जाते. झाडे तोडण्याचे कारण, झाडांचे छायाचित्र, त्याचबरोबर वृत्तपत्रामध्ये नोटीस द्यावी लागते. मात्र, महापालिका प्रशासनाने महापौर बंगल्यातील झाडे तोडण्यासाठी काय प्रक्रिया राबविली, याबाबत नेमकी माहिती मिळू शकली नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु