
परभणी, 29 एप्रिल (हिं.स.)।
येथून जवळच असलेल्या लोहगाव बसस्थानक परिसरातील पाच दुकानांना भीषण आग लागून मोठे नुकसान झाले. या घटनेत पाचही दुकाने जळून खाक झाली असून सुमारे 50 ते 60 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची माहिती समोर येत आहे.
लोहगाव येथे गावात लग्नसमारंभ असल्यामुळे बहुतांश नागरिक बाहेर गेले होते. त्यामुळे संबंधित दुकाने बंद होती. दरम्यान, दुकानांतून अचानक धूर बाहेर येताना दिसताच परिसरातील नागरिकांच्या ही बाब लक्षात आली आणि काही क्षणातच आगीने भीषण रूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच परभणी येथून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र, तोपर्यंत आगीने मोठे नुकसान झाले.
या आगीत हरीबाबा मशिनरी व नळ फिटिंग दुकानाचे सुमारे 25 लाखांचे नुकसान झाल्याचे दुकानमालक नारायण श्रीरामराव देशमुख यांनी सांगितले. तसेच राजेश पावडे यांच्या इंजिनिअरिंग वर्कच्या दुकानाचे सुमारे 10 ते 12 लाखांचे नुकसान झाले. सचिन धोत्रे यांच्या ऑटोमोबाईल दुकानातील अंदाजे 10 ते 15 लाखांचा माल जळून खाक झाला. गोपाल देशमुख यांच्या हॉटेलचेही मोठे नुकसान झाले आहे. या घटनेदरम्यान परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis