
मुंबई, 29 एप्रिल, (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर येथून कुटुंबासह मुंबईत पर्यटनासाठी आलेली ८ वर्षीय अनाबिया सुलतान मुस्ताक शेख ही अल्पवयीन बालिका मुंबईच्या अतिगर्दीच्या परिसरात हरविल्यानंतर, आझाद मैदान पोलीस स्टेशनच्या महिला सहाय्यक फौजदार चेतना पाटील व त्यांच्या पथकाने अवघ्या एका तासात तिचा शोध घेऊन तिला सुरक्षितपणे पालकांच्या ताब्यात दिले. या उल्लेखनीय कार्याबद्दल आज मंत्रालयात राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते संबंधित पोलीस कर्मचारी यांचा गौरव करण्यात आला.
मंत्रालयातील पर्यटन मंत्र्यांच्या दालनात आयोजित कार्यक्रमात महिला सहाय्यक फौजदार चेतना पाटील यांना प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
ही घटना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) या अतिगर्दीच्या आणि विस्तीर्ण रेल्वे स्थानक परिसरात घडली होती. दररोज लाखो प्रवाशांची वर्दळ असलेल्या या ठिकाणी हरविलेल्या बालिकेचा अल्पावधीत शोध घेणे हे अत्यंत आव्हानात्मक होते. मात्र, चेतना पाटील व त्यांच्या पथकाने दाखवलेली तत्परता, समन्वय आणि योग्यदिशेने तपास यामुळे हे शक्य झाले.
यावेळी मंत्री देसाई म्हणाले की, “मुंबईत येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणेने दाखविलेली तत्परता व संवेदनशीलता अत्यंत प्रशंसनीय आहे. पर्यटकांचा सुरक्षिततेवरील विश्वास अबाधित राखण्यासाठी अशा प्रकारचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. चेतना पाटील व त्यांच्या पथकाची कामगिरी संपूर्ण पोलीस दलासाठी प्रेरणादायी आहे.”
हरवलेल्या बालिकेचा तासाभरात शोध घेऊन तिला सुरक्षितपणे पालकांच्या ताब्यात देणे ही कर्तव्यदक्षतेची उत्कृष्ट जाणीव असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, महिला सहाय्यक फौजदार चेतना पाटील यांच्या नावाची विशेष प्रशस्ती व गौरवासाठी गृह विभागाकडे शिफारस करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांना सुरक्षित, विश्वासार्ह व सकारात्मक वातावरण उपलब्ध करून देणे ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता असून, पर्यटन स्थळे व गर्दीच्या ठिकाणी सुरक्षेची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर भर दिला जात आहे. यासाठी पोलीस यंत्रणा, स्थानिक प्रशासन व संबंधित विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधला जात आहे. अशा सकारात्मक उपक्रमांमुळे पोलीस दलाचे मनोबल वाढण्यासोबतच महाराष्ट्राची ‘सुरक्षित पर्यटन राज्य’ म्हणून ओळख अधिक बळकट होण्यास मदत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर