
परभणी, 29 एप्रिल, (हिं.स.)। ऑनलाइन औषधविक्री (ई-फार्मसी) वाढ, मोठ्या कंपन्यांचे किंमत धोरण तसेच जीएसआर 220 (ई) व जीएसआर 817 (ई) या अधिसूचना मागे घेण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने 20 मे रोजी एक दिवसीय देशव्यापी बंद पुकारला आहे.
महाराष्ट्र राज्य केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशन आणि ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट या संघटनांनी याबाबत निवेदन प्रसिद्ध केले आहे. देशभरातील सुमारे 12 लाख 40 हजार औषध विक्रेत्यांचे प्रतिनिधित्व करणार्या या संघटनांच्या मागण्या अद्याप प्रलंबित असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
ऑनलाइन माध्यमातून डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधांची विक्री, बनावट प्रिस्क्रिप्शनचा वापर तसेच अँटिबायोटिक्स औषधे सहज उपलब्ध होणे यामुळे रुग्णांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. तसेच मोठ्या कंपन्यांकडून कमी दरात औषध विक्री होत असल्याने लहान दुकानदार अडचणीत येत असल्याचेही सांगण्यात आले.
सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती परभणी जिल्हा केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संजय मंत्री व सचिव सूर्यकांत हाके यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis