
परभणी, 29 एप्रिल (हिं.स.)।
पाथरी येथील 2018 मधील भीषण अपघात प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने अपील मंजूर करत आरोपी कारचालकास दोषी ठरवून 2 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने यापूर्वी निर्दोष मुक्त केलेल्या आरोपीस अपीलात शिक्षा झाल्याने या प्रकरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
पाथरी तहसील कार्यालयासमोर रतन रोहीदास कड, त्यांची बहीण शिल्पा कड व भाचा समर्थ हे उभे असताना मानवतकडून भरधाव व निष्काळजीपणे आलेल्या पांढर्या रंगाच्या कारने त्यांना जोरदार धडक दिली होती. या अपघातात समर्थचा जागीच मृत्यू झाला, तर शिल्पा कड या गंभीर जखमी झाल्या होत्या. या प्रकरणाचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर बोधगिरे यांनी करून आरोपी सुनिल लिंबाजी सोनवणे (वय 51, रा. भीमनगर, परळी, जि. बीड) याच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, पाथरी यांनी 18 मे 2022 रोजी आरोपीची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र या निकालाविरोधात फिर्यादीने जिल्हा व सत्र न्यायालय, परभणी येथे अपील दाखल केले होते.
जिल्हा व सत्र न्यायाधीश-1 एन. आर. नाईकवाडे यांच्या न्यायालयात सुनावणी होऊन अपील मंजूर करण्यात आले व आरोपीस दोषी ठरविण्यात आले.न्यायालयाने आरोपीस भादंवि कलम 304 (अ) अंतर्गत 2 वर्षे सक्तमजुरी व दंड, कलम 279 अंतर्गत 6 महिने सक्तमजुरी, तसेच कलम 337 व 338 अंतर्गत शिक्षा सुनावली. याशिवाय फिर्यादीस शासनामार्फत नुकसानभरपाई देण्याचे आदेशही देण्यात आले.
या खटल्यात मुख्य सरकारी अभियोक्ता अॅड. ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली अॅड. आनंद गिराम यांनी सरकारतर्फे बाजू मांडली, तर फिर्यादीतर्फे अॅड. भारत चिलवंत यांनी युक्तिवाद केला. प्रकरणाच्या पैरवीसाठी पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी व पोलिस कर्मचार्यांनी काम पाहिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis