जळगावात २५ लाखांचा मुद्देमाल जप्त आणि १९५ आरोपींना बेड्या!
जळगाव, 29 एप्रिल (हिं.स.) जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी ‘ऑल आऊट’ विशेष मोहीम राबविली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या धडक कारवाईत
जळगावात २५ लाखांचा मुद्देमाल जप्त आणि १९५ आरोपींना बेड्या!


जळगाव, 29 एप्रिल (हिं.स.) जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी ‘ऑल आऊट’ विशेष मोहीम राबविली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या धडक कारवाईत पोलिसांनी २५ लाख १३ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, एकूण १९५ आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि संदीप गावीत यांच्या देखरेखीत ही मोहीम सकाळी १० ते रात्री ११ या वेळेत राबविण्यात आली. जिल्ह्यातील ३६ पोलीस ठाणे, ३ वाहतूक शाखा आणि स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) संयुक्तपणे संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी केली होती. या दरम्यान अवैध धंदे, गुन्हेगार आणि समाजकंटकांचा शोध घेऊन १०१ गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. अवैध दारू व जुगार: दारू विक्रीच्या १३६ प्रकरणांत मोठी कारवाई करून मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच जुगार कायद्यांतर्गत ५७ प्रकरणांत ५७ आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

वाहतूक नियमभंग: ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’च्या २७२ प्रकरणांत २ लाख ८२ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच फॅन्सी नंबर प्लेट आणि बुलेट सायलेन्सर वापरणाऱ्या १५० वाहनांवर कारवाई करून १ लाख ४ हजार १०० रुपयांचा दंड आकारला. अंमली पदार्थ व शस्त्रे: अंमली पदार्थविरोधी कायद्यांतर्गत १५ गुन्हे दाखल झाले. आर्म अॅक्टनुसार कारवाई करत पोलिसांनी तलवारी आणि इतर धारदार शस्त्रेही जप्त केली आहेत.

इतर कारवाई: ‘कोटपा’ (COTPA) कायद्यांतर्गत २३३ प्रकरणांत दंड आकारण्यात आला.या विशेष मोहिमेदरम्यान पोलिसांनी केवळ गुन्हेगारांवरच कारवाई केली नाही, तर सामाजिक बांधिलकीही जपली. ‘मुस्कान’ मोहिमेद्वारे शोध घेत पोलिसांनी ३४ हरविलेले बालक आणि महिलांना शोधून काढण्यात यश मिळविले आहे. जिल्हा पोलिसांनी राबविलेल्या या व्यापक कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली असून, जळगाव शहरातील आणि जिल्ह्यातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. गुन्हेगारांवर असाच वचक कायम ठेवला जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande