आरपीएफची दुहेरी कारवाई; पोखर्णी नृसिंह रेल्वे स्थानकाजवळून दोन संशयित ताब्यात
‘ऑपरेशन अमानत’ अंतर्गत प्रवाशांचे 4.60 लाखांचे सामान केले परत परभणी, 29 एप्रिल (हिं.स.)। विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) दोन स्वतंत्र कारवायांत सतर्कता दाखवत रेल्वे परिसरातील सुरक्षा मजबूत ठेवण्याबरोबरच प्रवाशांच्या मालमत्त
आरपीएफची दुहेरी कारवाई; पोखर्णी नृसिंह रेल्वे स्थानकाजवळून दोन संशयित ताब्यात


‘ऑपरेशन अमानत’ अंतर्गत प्रवाशांचे 4.60 लाखांचे सामान केले परत

परभणी, 29 एप्रिल (हिं.स.)।

विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) दोन स्वतंत्र कारवायांत सतर्कता दाखवत रेल्वे परिसरातील सुरक्षा मजबूत ठेवण्याबरोबरच प्रवाशांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यात यश मिळवले आहे.

रात्र गस्त व पिकेटिंगदरम्यान पूर्णा पोस्ट, परभणी येथील आरपीएफ तसेच जीआरपीचे कर्मचारी पोखर्णी नृसिंह रेल्वे स्थानकाजवळ गंगाखेड बाजूकडील होम सिग्नल परिसरात गस्त घालत होते. दोन व्यक्ती संशयास्पद अवस्थेत आढळून आल्या. आरपीएफ पथकाने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपली नावे राजू व छगन (दोघेही रा. परभणी) अशी सांगितली. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना जीआरपी, परळी यांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी जीआरपी परळी येथे गुन्हा क्रमांक 0034/2026, महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 च्या कलम 122 (सी) अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे.

दुसर्या घटनेत, ‘ऑपरेशन अमानत’ अंतर्गत 21 एप्रिल रोजी नांदेड नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळाली की, गाडी क्रमांक 12716 सचखंड एक्सप्रेसच्या ए-2 डब्यात तीन बॅगा बेवारस अवस्थेत आढळल्या आहेत. तत्काळ कारवाई करत सेलू रेल्वे स्थानकावर गाडी आल्यानंतर संबंधित बॅगा सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आल्या. यानंतर बॅगांच्या मालकाचा शोध घेऊन त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला. संबंधित प्रवासी कदम अश्रू किसन (वय 32, रा. जोतिबाचीवाडी, उस्मानाबाद) यांनी आपण जालना ते अमृतसर प्रवासादरम्यान चुकून आपले सामान दुसर्या गाडीत ठेवल्याचे सांगितले. पडताळणीनंतर त्यांना त्यांचे सामान पावती घेऊन सुरक्षितपणे सुपूर्द करण्यात आले.

या बॅगांमध्ये सुमारे 30 ग्रॅम सोन्याचे दागिने (अंदाजे किंमत 4.5 लाख), कपडे, चार्जर, पर्स व खाद्यपदार्थ असा एकूण 4.60 लाख किमतीचा ऐवज होता. या दोन्ही कारवायांमुळे आरपीएफ विभागाची सतर्कता, कर्तव्यदक्षता आणि प्रवाशांच्या सुरक्षेबाबतची बांधिलकी अधोरेखित झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande