
जळगाव, 29 एप्रिल, (हिं.स.)| रावेर तालुक्यातील अजंदे-रावेर रस्त्यावर वीज वाहिनीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामावेळी मोठी दुर्घटना घडली. झाडाची फांदी वीज वाहिनीवर पडल्याने लागलेल्या आगीत एका शेतकऱ्याचे सुमारे तीन एकर मका पीक जळून खाक झाले. तर १०० ते १५० केळींच्या खोडांजवळील नळ्या व पाइपही जळाले. या घटनेत सुमारे दहा लाखांपर्यंत नुकसान झाले. अजंदे-रावेर रस्त्यावर सोलर लाईन सप्लायच्या देखभाल दुरुस्तीचे काम सुरू होते. हे काम सुरू असताना झाडाची एक मोठी फांदी दुसऱ्या वीज वाहिनीवर पडली. यामुळे ठिणग्या उडून काही क्षणातच शेतात आग लागली. वाऱ्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले आणि पाहता पाहता डोलणारे मक्याचे पीक आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
या आगीत सुमारे ३ एकर मका पीक पूर्णपणे जळून खाक झाले. तसेच परिसरातील १०० ते १५० केळीच्या खोडांना दिलेली ठिबक सिंचनाची नळी आणि पाईप्सही जळून खाक झाले आहेत. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने संबंधित शेतकरी हवालदिल झाला असून त्याचे १० लाखांपर्यंत आर्थिक नुकसान झाले आहे आगीची माहिती मिळताच रावेर पालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र, आग विझवण्याचे काम सुरू असतानाच ‘एअर लॉक’ झाल्याने अग्निशमन दलाची गाडी बंद पडली. ऐन आणीबाणीच्या वेळी यंत्रणा कोलमडल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. नशिबाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र यंत्रणेच्या ढसाळ नियोजनाचा फटका शेतकऱ्याला बसला.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर