
डोंबिवली, 29 एप्रिल (हिं.स.) - डोंबिवली पश्चिम विभागातील रेतिबंदर रोडवरील रेल्वे क्रॉसिंग क्रमांक १ येथे प्रस्तावित रेल्वे उड्डाणपूल संदर्भात महत्त्वपूर्ण प्रगती झाली असून कल्याण डोंबिवली महानगरपालिका माध्यमातून या कामासाठी निविदा जाहीर करण्यात आली आहे. हा उड्डाणपूल चार लेन स्वरूपात विकसित करण्यात येणार असल्याने शहरातील वाहतूककोंडीचा प्रश्न काही प्रमाणात निकाली निघेल असे आता खुद्द डोंबिवलीकर म्हणत आहेत.
डोंबिवली पश्चिम व पूर्व भागांना जोडणारा हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असून, सध्या रेल्वे फाटकामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. विशेषतः गर्दीच्या वेळेत नागरिकांना दीर्घकाळ थांबावे लागते, ज्याचा परिणाम दैनंदिन जीवनावर तसेच आपत्कालीन सेवांवरही होतो. या पार्श्वभूमीवर उड्डाणपूल उभारणीची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती.
भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण तसेच भाजपा ठाणे विभाग प्रसिद्ध प्रमुख तथा नगरसेवक दिपेश पुंडलीक म्हात्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा विषय प्रशासनाच्या पातळीवर प्रभावीपणे मांडला गेला होता.
पूर्वी प्रस्तावित असलेला हा उड्डाणपूल दोन लेनचाच होता. मात्र दिपेश पुंडलीक म्हात्रे यांच्या पाठपुराव्यामुळे आता हा उड्डाणपूल चार लेन स्वरूपात विकसित करण्यात येणार आहे.
सदर निविदा सूचना क्र. 9/2026-27 अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आली असून प्रकल्पाचा कालावधी सुमारे २४ महिन्यांचा प्रस्तावित आहे. या उड्डाणपुलामुळे भविष्यातील वाढत्या वाहतुकीचा विचार करून अधिक सक्षम रस्तेव्यवस्था उपलब्ध होणार आहे. यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल व प्रवास अधिक वेगवान व सुरक्षित होईल. या उड्डाणपुलामुळे नागरिकांचा वेळ आणि इंधनाची बचत होईल.
डोंबिवली शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये भरीव सुधारणा घडवून आणणारा हा प्रकल्प ठरणार असून, शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा डोंबिवलीकर व्यक्त करीत आहेत.
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi