
लातूर, 29 एप्रिल (हिं.स.) : शहरात आज प्रचंड उष्णतेची लाट उसळली असून सकाळपासूनच नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. अत्यावश्यक कामाशिवाय कोणीही बाहेर पडण्यास तयार नसल्याचे चित्र दिसत आहे. नेहमी गजबजलेल्या रस्त्यांवरही आज शुकशुकाट जाणवत असून, जणू काही संचारबंदीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
सूर्य अक्षरशः आग ओकत असल्यामुळे शहरातील तापमान झपाट्याने वाढले आहे. नागरिकांच्या मते आज तापमान ४२ ते ४४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान असावे, अशी चर्चा आहे. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे लातूर जिल्ह्यात अधिकृत तापमापक यंत्रणा नसल्यामुळे अचूक तापमानाची नोंद उपलब्ध नाही. जिल्हा प्रशासनालाही याबाबत ठोस माहिती देणे शक्य झालेले नाही.
उष्णतेच्या तीव्रतेमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कामानिमित्त बाहेर पडणाऱ्यांसाठी शासकीय कार्यालयांच्या परिसरातही सावलीची कोणतीही सोय नसल्याचे दिसून येते. दुचाकी लावण्यासाठी किंवा थोडा वेळ थांबण्यासाठी झाडांची कमतरता जाणवत आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे. सार्वजनिक ठिकाणी सावलीची व्यवस्था करणे, शहरात ठिकठिकाणी पाणपोई सुरू करणे, तसेच १ मे महाराष्ट्र दिनापूर्वी अधिकृत तापमापक बसवणे, या मागण्या पुढे येत आहेत.
उष्णतेच्या वाढत्या तीव्रतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, प्रशासनाने त्वरित लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.-----------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis