पुरोहित संघाने कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मांडलेल्या ध्वज स्तंभाला प्रशासनाची अखेर मान्यता
नाशिक, 29 एप्रिल, (हिं.स.)। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथील पुरोहित संघाने मांडलेली भव्य ध्वजस्तंभ उभारणीची मागणी अखेर मान्य करण्यात आली आहे. कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी या मागणीस सकारात्मक प्रतिसाद दिल्याने पुरोहित संघात समाध
The administration finally


नाशिक, 29 एप्रिल, (हिं.स.)। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथील पुरोहित संघाने मांडलेली भव्य ध्वजस्तंभ उभारणीची मागणी अखेर मान्य करण्यात आली आहे. कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी या मागणीस सकारात्मक प्रतिसाद दिल्याने पुरोहित संघात समाधान व्यक्त होत आहे. या ध्वजस्तंभाचे शिलान्यास पूजन लवकरच पार पाडण्यात येणार असून, सिंहस्थाच्या आध्यात्मिक वैभवात भर घालणारा हा उपक्रम ठरणार आहे.

प्रस्तावित ध्वजस्तंभ सुमारे ५१ फूट उंच असणार असून, त्याची रचना अत्यंत आकर्षक व धार्मिक प्रतीकांनी समृद्ध अशी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण स्तंभाच्या संकल्पनेत अमृत मंथन कथेचा आधार घेतला गेला आहे. यामधून धर्म, संस्कृती आणि अध्यात्म यांचा संगम दर्शवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

सदर ध्वजस्तंभावर विविध प्रतीकात्मक शिल्प आणि चिन्हांचा समावेश असणार आहे. यात प्रमुखतः अश्व, हत्ती, रत्न, कल्पवृक्ष, अप्सरा, तसेच देवी-देवतांची प्रतिकात्मक शिल्पे कोरली जाणार आहेत. याशिवाय स्तंभावर गणपती आणि कमळ यांसारखी शुभचिन्हे देखील असतील. या सर्व घटकांमधून अमृत मंथनातील विविध घटक आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित केले जाणार आहे.

स्तंभाच्या तळभागाची रचना कमळाच्या आकारात करण्यात येणार असून, मध्यभागी कोरीव कलाकुसर असलेले पट्टे आणि विविध धार्मिक चिन्हांनी सजवलेले भाग असतील. शीर्षस्थानी ध्वजासह देवतांची प्रतिमा स्थापित केली जाणार आहे, ज्यामुळे संपूर्ण स्तंभ अधिक भव्य आणि दैदिप्यमान दिसणार आहे.

यासोबतच, सध्या अस्तित्वात असलेला जुना ध्वजस्तंभ काढून त्याजागी नवीन ध्वजस्तंभ बसविण्यात येणार आहे, अशी माहिती पुरोहित संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी यांनी दिली. त्यामुळे नवीन ध्वजस्तंभ अधिक मजबूत, सुरक्षित आणि आकर्षक स्वरूपात उभारला जाणार आहे.

रामकुंड परिसरात उभारण्यात येणारा हा ध्वजस्तंभ भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल, तसेच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या परंपरेला अधिक बळकटी देईल. पुरोहित संघाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, लवकरच होणाऱ्या शिलान्यास सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande