
अमरावती, 29 एप्रिल (हिं.स.) : राज्य शासनाच्या वतीने सन 2024-25 आणि 2025-26 या कालावधीसाठी अमरावती जिल्हा युवा पुरस्कार जाहीर करण्यात आले असून, जिल्ह्यातील एकूण पाच व्यक्ती व संस्थांची निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारांचे वितरण 1 मे रोजी शहरातील पोलिस कवायत मैदानावर आयोजित कार्यक्रमात शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
या वर्षासाठी विशेष पुरस्कार म्हणून श्रीनिवास गणेश पोकळे यांची निवड झाली आहे. तसेच अमर पुरुषोत्तम वानखडे, जान्हवी राजेंद्र राऊत आणि श्री संताजी बहुउद्देशीय शिक्षण संस्था (गुरुदेवनगर, गुरुकुंज आश्रम, ता. तिवसा) यांचाही सन्मान करण्यात येणार आहे.
अमर वानखडे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंच स्थापन करून राज्यभर युवकांचे संघटन उभे केले आहे. जान्हवी राऊत या मोर्शी तालुक्यातील नया वाठोडा येथील रहिवासी असून, त्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवती विचार मंचच्या सचिव म्हणून कार्यरत आहेत. ग्रामीण भागात कीर्तन व प्रवचनांच्या माध्यमातून युवतींना संघटित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्या करीत आहेत.
श्री संताजी बहुउद्देशीय शिक्षण संस्था ही गरीब व आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत पुरविण्यासाठी ओळखली जाते.
या कालावधीसाठी वेदांत रामचंद्र मुंदाने, पूजा सुनील गुंजरकर आणि स्वामी विवेकानंद विचार मंच बहुउद्देशीय संस्था (अचलपूर) यांची निवड करण्यात आली आहे.
वेदांत मुंदाने यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करत 200 हून अधिक गावांतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. पूजा गुंजरकर यांनी ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियानांतर्गत दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले आहे.
स्वामी विवेकानंद विचार मंच बहुउद्देशीय संस्था, अचलपूर ही संस्था सामाजिक व युवक विकासाच्या क्षेत्रात सक्रिय कार्य करीत आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी ही माहिती दिली असून, पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी