
जळगाव , 29 एप्रिल (हिं.स.)सोशल मीडियावर मंत्री संजय सावकारे आणि विविध समुदायांची बदनामी करणारे वक्तव्य केल्यामुळे भुसावळचे माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यातच शहराचे माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ यांनी सोशल मीडियावरील फेसबुक पेजवर मंत्री संजय सावकारे तसेच विविध समाजाविषयी अवमानजनक व बदनामीकारक वक्तव्य केल्याने त्यांच्याविरोधात सोमवारी भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ करीत आहेत. शहरातील सोशल मीडियावरील प्रत्येक प्लॅटफार्मवर पोलिसांचे बारीक लक्ष आहे. कुणीही कोणत्या जाती, धर्माबद्दल अनादर करणारे वक्तव्य केल्यास त्यांच्याविरोधात पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांनी दिला आहे. सोशल मिडीयावरील व्हॉटसॲप ग्रुपची सेंटींग ॲडमिन केल्यास अनावश्यक वादही टळणार आहेत. नागरिकांनी शहराची शांतता अबाधीत ठेवावी, असे आवाहनही बारबोले यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर