
अकोला, 03 एप्रिल (हिं.स.)। एका बाजूला खाडी देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम सर्व स्तरांवर दिसून येत आहे. त्याचा मुख्य परिणाम पेट्रोल, डिझेल आणि गॅसवर अधिक जाणवत आहे. पेट्रोल-डिझेल टंचाईच्या अफवा जोरात पसरत असताना याच पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात काळाबाजारही सुरू झाल्याचे चित्र आहे.
अकोला पोलिसांकडून राबविण्यात येत असलेल्या “ऑपरेशन प्रहार” अंतर्गत मोठी कारवाई समोर आली आहे. पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने बोरगाव परिसरातील कोळंबी येथे अवैध डिझेल साठ्यावर छापा टाकला. गोपनीय माहितीनुसार करण्यात आलेल्या या कारवाईत तहसील कार्यालयाच्या निरीक्षण अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संयुक्त पथकाने रेड केली.
या वेळी मोहम्मद शेख इब्राहिम (वय २५ वर्षे) या तरुणाला ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडून कोणतीही परवानगी नसताना साठवून ठेवलेले ७५० लिटर डिझेल जप्त करण्यात आले असून त्याची किंमत अंदाजे ६७ हजार ५०० रुपये आहे. याशिवाय ७ रिकामे प्लास्टिक टँकही जप्त करण्यात आले आहेत. एकूण सुमारे ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.या प्रकरणी आरोपीविरुद्ध आवश्यक वस्तू अधिनियम १९५५ च्या कलम ३ आणि ७ अंतर्गत बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही संपूर्ण कारवाई पोलिस अधीक्षक अर्चित चांडक व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून पुढील तपास सुरू आहे.
--------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे